दोघांनाही उतरविले खाली ‘मनोहर’ विमानतळावरील घटना
प्रतिनिधी/ पणजी
मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोव्यातून मुंबईला उड्डाण करण्याच्या तयारीत असलेल्या एका विमानात दोघा रशियन प्रवाशांनी क्रू मेंबरशी गैरवर्तन केल्यामुळे त्यांना खाली उतरविण्यात आले.
‘गो फर्स्ट’ कंपनीच्या विमानात शुक्रवारी हा प्रकार घडला. गोव्यातून मुंबईला जाण्यासाठी सर्व प्रवाशी विमानात आसनस्थ झाल्यानंतर प्रत्यक्ष उड्डाणापूर्वी क्रू मेंबर्सकडून प्रवाशांना सेफ्टी ब्रीफिंग देण्यात येते. त्यावेळी सदर रशियन प्रवाशांनी त्या क्रू मेंबर्सशी गैरवर्तन केले. तसेच त्यांना शिवीगाळही केली.
हा प्रकार घडताच विमानातील अन्य प्रवाशांनी त्या रशियन प्रवाशांच्या गैरवर्तनावर आक्षेप घेतला. त्यामुळे दोघांनाही विमानातून उतरविण्यात आले.
त्यासंबंधी गो फर्स्टच्या वरिष्ठ अधिकाऱयाकडे विचारणा केली असता सदर प्रकार घडल्याची त्यांनी पुष्टी दिली. सदर दोन्ही प्रवाशांनी विमानातील क्रू मेंबर्सशी गैरवर्तन केले व शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांना उतरविण्यात आले. तसेच नंतर हे प्रकरण नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयास (डीजीसीए) कळवण्यात आले, असे सदर अधिकाऱयाने सांगितले.
दरम्यान, सदर प्रकाराबद्दल पोलिसांशी संपर्क साधला असता कोणतीही तक्रार देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.