भारतीय प्रतिभावान अन् प्रेरणादायी असल्याचे मतप्रदर्शन
मॉस्को / वृत्तसंस्था
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले. भारतीयांना ‘प्रतिभावान’ आणि ‘प्रेरणादायी’ लोक असे संबोधत भारतामध्ये मोठी क्षमता असल्याचे वक्तव्य पुतीन यांनी केले. भारत विकासाच्या बाबतीत उत्कृष्ट परिणाम साध्य करेल यात शंका नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
4 नोव्हेंबर रोजी रशियाच्या एकता दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात रशियन राष्ट्राध्यक्षांनी भारताबाबत मतप्रदर्शन केले. भारत हा प्रचंड क्षमता असलेला देश असल्याचे ते म्हणाले. भारतात प्रतिभावान आणि अतिशय प्रेरित लोक असून ते नेहमी अंतर्गत विकासासाठी झटत असतात. भविष्यात भारत नक्कीच विकासाच्या बाबतीत उत्कृष्ट परिणाम साध्य करेल यात शंका नाही. सुमारे दीड अब्ज लोकांमध्ये आता ती क्षमता असल्याचे पुतीन म्हणाले.
रशियन राष्ट्राध्यक्षांनी आफ्रिकेतील वसाहतवाद, भारताची क्षमता आणि रशियातील संस्कृती याबाबतही मते मांडली. आपल्या भाषणादरम्यान पुतीन यांनी रशियन आणि जागतिक इतिहासाबद्दलही मतप्रदर्शन केले. पाश्चात्य साम्राज्यांनी आफ्रिकेला लुटले होते. आधीच्या वसाहतवादी शक्तींनी मिळवलेली समृद्धीची पातळी आफ्रिकेच्या लुटीवर आधारित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच स्वतःच्या देशाविषयीही त्यांनी गुणगान गायिले. रशिया हा ख्रिश्चन धर्मावर आधारित संस्कृतीचा (युरोपियन शक्तींचा) महत्त्वपूर्ण भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. रशिया हा एक बहुराष्ट्रीय आणि एक संयुक्त प्रमुख जागतिक शक्ती म्हणून ओळखला जाणारा देश आहे. आणि त्यातच रशियाचे वेगळेपण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.