युरोपियन देशांनी रशियाच्या नैसर्गिक वायूच्या आयातीवर पूर्ण बंदी घालावी, अशी मागणी युक्रेनने केली आहे. जोपर्यंत रशियाच्या इंधन वायूवर हे देश अवलंबून आहेत, तोपर्यंत रशियावर दबाव येणार नाही. रशियाला मुख्य उत्पन्न त्याच्या ऊर्जास्रोतांच्या निर्यातीतून मिळते. हे लक्षात घेऊन युरोपियन महासंघाने पावले उचलावीत असा आग्रह या देशाच्या नेत्यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी ब्रुसेल्स येथे झालेल्या युरोपियन महासंघाच्या बैठकीत रशियाविरोधातील पाचव्या फेरीतील निर्बंधांना मान्यता देण्यात आली. तथापि, निर्बंध फारसे कठोर असू नयेत अशी व्यवस्थाही करण्यात आली. रशियाच्या ऊर्जेवर तातडीने पूर्ण बंदी घातल्यास युरोपात ऊर्जेची मोठी टंचाई निर्माण होऊन तेथील उद्योग व्यवसाय आणि सेवाक्षेत्र प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे रशियावर दबाव वाढवितानाच दुसरीकडे स्वतःच्या ऊर्जा आवश्यकती सुरक्षा सुनिश्चित करण्याची तारेवरची कसरत या देशांना करावी लागत आहे.
जोपर्यंत युरोप रशियाकडून ऊर्जा विकत घेत आहे, तोपर्यंत तो युक्रेनच्या पाठीशी पूर्णतः उभा राहू शकणार नाही. एकाबाजूला रशियाची ऊर्जा विकत घेऊन त्याला अर्थसाहाय्य करायचे आणि दुसरीकडे युक्रेनलाही शस्त्रपुरवठा करुन त्याचा प्रतिकार लांबवायचा, अशा दुहेरी नितीमुळे युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता आहे, असे परखड मत युक्रेनचे विदेश व्यवहार मंत्री कुलेबा यांनी व्यक्त केले.
अधिक समर्थन करणार
युरोप युक्रेनच्या पाठीशी उभा असून रशियाशी आर्थिक संबंध कसेही असले तर युक्रेनला एकाकी पाडणार नाही, अशी भूमिका युरोपियन महासंघाचे महासचिव स्टोलेनबर्ग यांनी घोषित केली. युक्रेनला आमच्याकडून युद्धसामग्री आणि इतर साधनांचा पुरवठा आवश्यकतेनुसार होत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.