युक्रेनच्या अध्यक्षांनी नागरिकांना केले सतर्क
युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी शनिवारी पहाटे स्वतःच्या देशवासीयांना सतर्क केले आहे. राजधानी कीव्हमधून मागे हटत असलेल्या रशियाच्या सैनिकांनी शहराबाहेरील भागांमध्ये ‘एक मोठे संकट’ निर्माण केले आहे, त्यांनी पूर्ण क्षेत्रात भूसुरुंग पेरले आहेत. घरांमध्ये आणि मृतदेहांजवळ देखील भूसुरुंग पेरले असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.
रशियाच्या सैन्याकडून लोकांना बाहेर काढण्याच्या कार्यांमध्ये सलग दुसऱया दिवशी अडथळे आणले गेल्याने मारियुपोल या बंदर असलेल्या शहरात मानवी संकट गडद निर्माण झाले आहे. तर क्रेमलिनने युक्रेनवर रशियाच्या भूमीवरील इंधन डेपोवर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला करण्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर झेलेंस्की यांनी स्वतःच्या नागरिकांना सतर्क केले आहे.
परंतु युक्रेनने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. परंतु रशियाच्या दाव्यांची पुष्टी झाल्यास युक्रेनने रशियाच्या भूमीवर केलेला हा पहिला हल्ला ठरणार आहे. दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू ठेवण्यासाठी अनुकूल वातावरण असणारी ही कारवाई निश्चितपणे नसल्याचे क्रेमलिनचे प्रवक्ते दमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे.
रशियाने कीव्हनजीकच्या भागांमधून स्वतःच्या काही सैनिकांना परत बोलाविण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. युक्रेनची राजधानी आणि उत्तरेकडील शहर चेर्निहाइव्हनजीक सैन्य हालचाली कमी करणार असल्याचे रशियाने मागील आठवडय़ाच्या प्रारंभी सांगितले होते.
रशियाचे सैन्य पूर्ण क्षेत्रात भूसुरुंग पेरत आहे. घरांनजीक ते भूसुरुंग सोडून जात आहेत. युद्धात मारले गेलेल्या लोकांच्या मृतदेहांनजीकही भूसुरुंग ठेवले जात आहेत. भूसुरुंग हटविले जात नाही आणि गोळीबाराचा धोका टळत नाही तोवर लोकांनी परतू नये असे आवाहन झेलेंस्की यांनी केले आहे.