डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचा पुढाकार : चाचणी आणि वितरणामध्ये सहकार्य करणार
मॉस्को / वृत्तसंस्था
रशियात झालेली कोरोनावरील लस स्पुटनिक-व्ही लवकरच भारताला मिळणार आहे. स्पुटनिक-व्ही लस परदेशी पाठवण्याची तयारी रशियाने सुरू केली आहे. भारतीय कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या साथीने लसीचे 10 कोटी डोस विकण्याची तयारी रशियन सोव्हेरिजयन वेल्थ फंडने दर्शवली आहे.
रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) भारतीय कंपन्यांसोबत केलेल्या करारानुसार 30 कोटी डोसची निर्मिती भारतात केली जाणार असल्याचे समजते. भारतातील अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक असलेली डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज स्पुटनिक-व्ही लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचण्या भारतात घेणार असल्याची माहिती ‘आरडीआयएफ’ने दिली आहे. तसेच चाचणी यशस्वी झाल्यानंतर डोसचे वितरण करण्यातही हीच कंपनी पुढाकार घेणार आहे
कोरोनावरील लसीची नोंदणी करणारा रशिया हा जगातला पहिला देश आहे. तिसऱया टप्प्यातल्या चाचण्या व्यापक प्रमाणात पूर्ण होण्याआधीच रशियाने लसीची नोंदणी केली. त्यामुळे डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी लसीच्या कार्यक्षमता आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्पुटनिक-व्ही लसीचे पहिल्या आणि दुसऱया टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक होते, अशी माहिती जी. व्ही. प्रसाद यांनी दिली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्पुटनिक व्ही विश्वासार्ह पर्याय असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
किंमत अजूनही गुलदस्त्यात
भारतात लसीच्या तिसऱया टप्प्यातल्या चाचण्या झाल्यानंतर नियामक संस्थेकडे तिची नोंदणी करण्यात येईल. यानंतर चालू वर्षाच्या अखेरीस भारतात स्पुटनिक-व्ही लस निर्यात केली जाईल. या लसीची किंमत नेमकी किती असेल, याची माहिती आरडीआयएफने दिलेली नाही. मात्र कोरोना लसीच्या विक्रीतून आम्हाला नफा कमवायचा नाही. निर्मितीसाठी आलेला खर्च वसूल होईल, इतकाच विचार करून लसीची किंमत ठरवण्यात येईल, असे आरडीआयएफनं याआधी म्हटले होते. त्यामुळे लसीची किंमत जास्त नसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
तिसऱया स्वदेशी लसीवर भारतात काम सुरु सीएसआयआर-अरबिंदो फार्मा आले एकत्र
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अर्थात (सीएसआयआर) आणि अरबिंदो फार्मा लिमिटेड हे संयुक्तरित्या कोविड-19 आजारावर लस तयार करणार आहेत. भारतातील ही तिसरी स्वदेशी लस असणार आहे.
‘सेंटर फॉर सेल्युलर ऍण्ड मोलेक्मयुलर बायोलॉजी’ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सीएसआयआर-सीसीएमबी आणि अरबिंदो फार्मा यांच्यामध्ये कोविड-19ची लस तयार करण्याबाबत करार करण्यात आला आहे. दोन्हींच्या भागिदारीतून ही लस तयार करण्यात येणार आहे.
सीसीएमबी हैदराबाद, इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल टेक्नॉलॉजी- चंदीगड आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल बायोलॉजीöकोलकाता या ‘सीएसआयआर’च्या तीन प्रयोगशाळांमध्ये विविध तांत्रिक व्यासपीठावर ही लस तयार केली जाणार आहे. तर अरबिंदो फार्मा या लसीच्या वैद्यकीय विकास आणि व्यावसायिकीकरणावर काम करणार आहे.
लस तयार करण्यासाठी सीएसआयआरच्या अव्वल दर्जाच्या प्रयोगशाळा फार्मा इंडस्ट्रीसोबत एकत्र आल्यामुळे भारताच्या स्वदेशी लस निर्मिती आणि भविष्यातील महामारिंविरोधात काम करण्यासाठी मदत होणार असल्याचे सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी स्पष्ट केले आहे. सीएसआयआरसोबतच्या भागिदारीपूर्वी अरबिंदो फार्मा कोविड-19 आजारावर लस तयार करीत आहे. संपूर्ण मालकीच्या अमेरिकन सहाय्यक कंपनी ऑरो व्हॅक्सीन्सद्वारे ही लस तयार केली जात आहे.