प्रतिनिधी / मडगाव
कोंबवाडा-मडगाव येथील रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणावरून काल भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये प्रचंड राडा झाला. या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरण्याचे श्रेय घेण्यासाठी भाजप व काँग्रेसमध्ये चुरस लागली होती. त्यात या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ देखील दोन वेळा करण्यात आला. सुरवातीला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी तर नंतर सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी नारळ फोडून कामाचा शुभारंभ केला. त्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दोघां अभियंत्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकारावर मंत्री पाऊसकर यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
कोंबवाडा मडगाव येथील रस्त्याचे काम गेली अनेक मलनिस्सारण योजना तसेच इतर कामामुळे हे काम रखडले होते. मनोहर पर्रीकर असताना हे काम प्राधान्य क्रमाने हाती घ्यावे असा निर्णय झाला होता. तरी सुद्धा मलनिस्सारण योजनेची वाहिनी बदलावी लागल्याने त्याला विलंब झाला होता. शेवटी त्याला गेल्या वर्षी या कामाला प्रारंभ होणार होता. मात्र, कोरोना महामारीमुळे पुन्हा वर्षभर हे काम रखडले. काल गुरूवारी जेव्हा या कामाचा शुभारंभ करण्याचे ठरले, त्यावेळी रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी भाजप व काँग्रेसमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली होती.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मडगावच्या महिला नूतन हायस्कूलजवळ या हॉटमिक्स डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला तर कोंब विठ्ठल मंदिराजवळ मंत्री श्री. पावसकर यांनी नारळ फोडून शुभारंभ केला. यावेळी काँग्रेस व भाजप यांनी हॉटमिक्स डांबरीकरणाचे श्रेय घेण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यात दिगंबर कामत यांनी सुरवातीला शुभारंभ केल्याने व त्याला दोन अ भयंत्यांनी सहकार्य केल्याचा ठपका ठेऊन या दोन्ही अभियंत्यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. भाजपचे कार्यकर्ते चंदन नायक यांनी तर एका अभियंत्याने डोक्यावर कॅप घातली होती, ती सुद्धा काढून घेण्याचा प्रकार घडला.
आपल्यासाठी असा प्रसंग पहिलाच
दरम्यान, मंत्री दीपक पाऊसकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्यासाठी असा प्रसंग पहिलाच असल्याचे स्पष्ट केले. या पुढे असे प्रकार घडू नये, याची पूर्ण खबरदारी घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना जी वागणूक मिळाली, त्यावर देखील मंत्री श्री. पाऊसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या पुढे असा गोंधळ होऊ नये, यासाठी आपण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना स्पष्ट निर्देश देणार असून अभियंतेच कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणार त्याच प्रमाणे कार्यक्रम होतील. एका ठिकाणी कार्यक्रम निश्चित केला जाईल, त्याच ठिकाणी स्थानिक आमदार तसेच स्थानिक नगरसेवक, नगराध्यक्ष, सरपंच, पंच सदस्य यांनी उपस्थितीत रहावे लागेल. दोन वेळा शुभारंभ किंवा उद्घाटन होणार नसल्याचे मंत्री पाऊसकर यांनी स्पष्ट केले.
हा तर टेबलावरील केळे काढण्याचा प्रकार
प्रसार माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले की, मडगाव मतदारसंघातील जेव्हढी विकासकामे आजवर झालेली आहेत व होणार आहेत. त्याचा पाठपुरावा आपणच केला असून सरकार दरबारातून त्याला मान्यता मिळविलेली आहे. आपल्या कामाची पद्धत मडगावच्या तमाम जनतेला ठाऊक आहे. तरी सुद्धा कोंबवाडय़ावरील रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचे श्रेय घेण्यासाठी जी पद्धत वापरली ती पाहता ‘मेजावयले केळे काडून ओर्र जोडपा’ सारखाच प्रकार होता.
कामाचा पाठपुरावा भाजपनेच केला
दरम्यान, मडगावचा विकास साधण्यास स्थानिक आमदार दिगंबर कामत यांना अपशय आल्याची टीका मडगाव भाजप मंडळाचे सरचिटणीस नवीन पै रायकर व शर्मद पै रायतूरकर यांनी केली. कोंबवाडय़ावरील रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. त्याचा पाठपुरावा भाजपनेच करून हे काम मार्गी लावल्याचा दावा यावेळी श्री. रायकर व श्री. रायतूरकर यांनी केला. कोंबवाडय़ावरील मलनिस्सारण योजनेची वाहिनी बदलण्याचे काम देखील भाजपनेच केल्याचा दावा करण्यात आला. ही कामे करण्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे व सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांचे त्यांनी आभार मानले.