कचरा टाकणाऱयांवर करणार दंडात्मक कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
रस्त्याशेजारी कचरा टाकू नये असे आवाहन अनेकवेळा करूनही नागरिकांची मानसिकता बदलत नाही. त्यामुळे रस्त्याशेजारील ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी कचराकुंड हटवून सुशोभिकरण करण्यावर भर दिला आहे. होसूर शाळा क्रमांक 8 परिसरात नेहमी कचरा टाकण्यात येत होता. पण महापालिकेने या परिसराचे सुशोभिकरण करून कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देणारा फलक लावला आहे.
शहरात विविध खुल्या जागा व रस्त्याशेजारी साचणाऱया कचऱयामुळे डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे कचराकुंड हटविण्यासह कचऱयाचे ब्लॅक स्पॉट हटविण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. शहरातील विविध परिसरातील कचराकुंड हटविल्यानंतर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने आपला मोर्चा होसूर, शहापूर परिसरात वळविला आहे. होसूर येथील शाळा क्रमांक 8 च्या परिसरात कचरा साचत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आल्याने हा परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर कचरा टाकणाऱयांवर नजर ठेवून दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे परिसरात कचरा टाकण्याचे बंद झाले. ब्लॅक स्पॉटच्या जागेत विविध शोभेची रोपे लावून सुशोभिकरण करण्यात आले. तसेच कचरा टाकणाऱयांना कारवाईचा इशारा दिला आहे.