महंमद हमजा मालिकावीर, फरान शेख सामनावीर
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित रोहित पोरवाल पुरस्कृत साई चषक 12 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या युनियन जिमखाना संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाचा 9 गडय़ांनी पराभव करून साई चषक पटकाविला. महंमद हमजाला मालिकावीर, फरान शेखला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 22.3 षटकात 3 बाद 94 धावा केल्या. इम्तियाज मंडलने 18, आरूष कुंदपने 14 धावा केल्या. जिमखानातर्फे फरान शेखने 3, सुरज सक्रीने 2, तर अनिस तेंडुलकर व अनिस अब्बास यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखानाने 10 षटकात 1 बाद 97 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. अर्जुन येळ्ळूरकरने 1 षटकार 11 चौकारासह 55, शारूख धारवाडकरने नाबाद 26 धावा केल्या. अर्जुन व शारूख यांनी पहिल्या गडय़ासाठी 93 धावांची भागीदारी केली. बेळगाव स्पोर्ट्सतर्फे कनिष्कने 1 गडी बाद केला.
प्रमुख पाहुणे रोहित पोरवाल, आरती पोरवाल, कांचन पोरवाल, संजय मोरे, सुहास कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला आकर्षक चषक व सर्व खेळाडूंना पदके देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर फरान शेख, उगवता क्रिकेटपटू शारूख धारवाडकर, उत्कृष्ट फलंदाज कलश बेन्नकट्टी, उत्कृष्ट गोलंदाज अब्बास किल्लेदार, इम्पॅक्ट खेळाडू अनिश तेंडुलकर, मालिकावीर महंमद हमजा यांना चषक देवून गौरविण्यात आले. यावेळी रणजीपटू मिलिंद चव्हाण, सचिन साळुंके, प्रमोद पालेकर, सहजद पठाण आदी उपस्थित होते.