गल्लीबोळांसह मुख्य रस्त्यावर निरव शांतता
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना संसर्गात हॉटस्पॉट ठरलेल्या सातारा तालुक्यातसह शहर व परिसरात मंगळवारी लॉकडाऊन इफेक्ट दिसून आला. सकाळपासून शहरातील मुख्य चौकांसह शहराच्या प्रवेशद्वारांवर पोलिसांनी कडकोट बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले होते. कडक उन्हाच्या झळा खात रस्ते ओस पडले होते. तर शहरातील सर्व गल्लीबोळात दिसणारी वर्दळ देखील गायब झाल्याने खऱया अर्थाने पहिल्या दिवशीच राजधानी सुनसान झाली होती.
मध्यरात्रीपासून सहा दिवसासाठी जिह्यात कडक लॉकडाउन जारी करण्यात आला आहे. यामुळे सातारा शहर परिसरातील शासकीय, खासगी रुग्णालय, मेडिकल, पेट्रोल पंप, दूध या अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. बुधवारी सकाळपासूनच शहरातील रस्त्यांसह सीमा सील करण्यात आल्या होत्या. शहरातील जिल्हा मुख्यालय मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मोती चौक, कमानी हौद परिसर, पोवई नाका, बस स्थानक, विसावा नाका, बॉम्बे रेस्टॉरंट परिसर, वाढे फाटा येथे मोठय़ा प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते. किराणामाल, भांडी, कपडे, जनरल स्टोअर्स, परमिट रूम बियर बार, भाजीपाला, हॉटेल्स- लॉजिंग, पान टपऱया, बेकरी आदी दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. बससेवेलाही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून सातारा पूर्णपणे ओस पडला आहे.
दंडात्मक कारवाईचा बडगा
लॉकडाऊन जारी केला असतानाही दुचाकी चारचाकी वाहनांमध्ये शहरात फिरणाऱया नागरिकांची संख्या फार मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. अशा नागरिकांवर पोलिसांनी आज दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. सकाळी साडेदहा वाजता जिल्हा परिषद चौकात सातारा शहर पोलिसांच्या पथकाने 30 पेक्षा अधिक वाहनचालकांवर कारवाई केली. किरकोळ अपवाद वगळता मग रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. वर्दळ थंडावली तरी बंदोबस्तावरील पोलिसांना मात्र भर कडक उन्हात आपले कर्तव्य निभावावेच लागत होते.
राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट
जिह्यात कडक लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाबींना निर्बंध घालण्यात आले आहेत. सातारा शहराजवळ पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे. या मार्गावर आज दिवसभर अत्यंत तुरळक वाहने धावताना दिसत होती. एरवी 24 तास या महामार्गावरून वाहनांची ये-जा सुरू असत. मात्र प्रशासनाने निर्बंध घातल्यामुळे लोकांनी घरी बसणे पसंत केले.
रुग्णाच्या एका नातेवाईकास मिळणार पास
बहुतांश वेळा काही लोक रुग्णालयात नातेवाईक असल्याचे सांगून बाहेर फिरत असल्याची तक्रारी प्रशासनाच्या कानावर येऊ लागल्या. अखेर ही गर्दी कमी करण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या एका नातेवाइकाला पास देण्यासाठी पोलिस दलाने यंत्रणा उभारली आहे. ज्या शासकीय कोविड 19 रुग्णालयात रुग्ण दाखल आहे. तेथील व्यवस्थापनास संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाने त्याचे नाव द्यायचे आहे. त्यानंतर संबंधित व्यवस्थापन रुग्णाच्या नातेवाईकास पास देणार आहे. या पासच्या आधारे संबंधित रुग्णाच्या नातेवाईकास रुग्णालय परिसर आणि इतर ठिकाणी आवश्यक गोष्टींसाठी जाण्यास परवानगी राहणार आहे.