आयपीएल : दुबईत होणाऱया आजच्या सामन्यात पुन्हा धावांची बरसात होणार
वृत्तसंस्था/ दुबई
बुधवारी होणाऱया आयपीएलमधील सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱया राजस्थन रॉयल्सला रोखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना जबरदस्तच कामगिरी करावी लागणार आहे. या सामन्यातही धावांची आतषबाजी होण्याची अपेक्षा आहे. सायंकाळी 7.30 पासून या सामन्याला प्रारंभ होईल.
अंडरडॉग्स म्हणून स्पर्धेची सुरुवात करणाऱया राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 224 या आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करून मोठा दबदबा निर्माण केला आहे. दोन सामन्यात दोन विजय मिळविणाऱया राजस्थानने 200 धावांचा टप्पा अगदी सहजतेने पार करून दाखविला. त्यांच्या या यशात संजू सॅमसन व राहुल तेवातिया हे दोन स्टार फलंदाज त्यांना गवसले आहेत. या दोघांनीही प्रस्थापित खेळाडूंना मागे टाकणारी कामगिरी करून दाखविली आहे. दुसरा सामना खेळणारा हरियाणाचा तेवातिया पंजाबविरुद्ध 31 चेंडूत 53 धावा फटकावत रातोरात स्टार बनला आहे. त्याच्या या वादळी खेळीमुळेच राजस्थानला 224 धावांचे कठीण आव्हान 3 चेंडू बाकी ठेवत सहज पार करता आले. प्रारंभी त्याला अजिबात सूर गवसला नव्हता. त्याने 17 धावा काढण्यासाठी तब्बल 23 चेंडू घेतले होते. पण 3 षटकांत 51 धावांची गरज असताना त्याने तुफानी फटकेबाजी करताना शेल्डॉन कॉट्रेलच्या एका षटकात 5 षटकार ठोकून सामन्यालाच कलाटणी दिली.
असे असले तरी सॅमसनने जास्त सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. त्याने आतापर्यंतच्या सामन्यात 214.86 च्या स्ट्राईकरेटने धावा फटकावताना दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे भारतीय संघात यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून स्थान मिळविण्यासाठी निवडकर्त्यांना विचार करण्यास त्याने भाग पाडले आहे. त्यांचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही दोन अर्धशतकांसह भरवशाची कामगिरी केली आहे तर सलामीवीर जोस बटलर धमाका करण्यास सज्ज झाला आहे.
राजस्थानशी बरोबरी करण्यासाठी किंवा त्यांना मागे टाकण्यासाठी केकेआरकडे आंदे रसेल, इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन यांच्या रूपात मोठे स्टार आहेत. मात्र पाचव्या व सहाव्या क्रमांकावर ते फलंदाजीस येत असल्याने या दोघांनाही आतापर्यंत मर्यादितच संधी मिळाली आहे. बुधवारच्या सामन्यात त्यांना बढती मिळण्याची जास्त शक्यता आहे, विशेषतः जमैकाचा स्टार रसेलला. गेल्या मोसमातील केकेआरचा तो 204.81 च्या स्ट्राईकरेटने सर्वाधिक (510) धावा जमविणारा फलंदाज आहे. केकेआरला पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. पण सनरायजर्सविरुद्ध त्यांनी थोडी सुधारित कामगिरी करीत मुसंडी मारली आहे. सलामीवीर शुभमन गिलचे नाबाद अर्धशतक आणि मॉर्गनची फटकेबाजी यामुळे सनरायजर्सचे 145 धावांचे माफक आव्हान त्यांनी दोन षटके बाकी ठेवत सहजपणे पार केले. बुधवारी पुन्हा एकदा धावांची बरसात होण्याची अपेक्षा असून राजस्थानविरुद्ध कोणतेही आव्हान सुरक्षित मानता येणार नाही. या मोसमात दोन सामने टाय झाले आणि हे दोन्ही सामने दुबईतच झाले आहेत. विशेष म्हणजे या मैदानावर झालेल्या पाचही सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झाला आहे.
संघ : केकेआर : दिनेश कार्तिक (कर्णधार), रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, फर्ग्युसन, नितिश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नरेन, कमिन्स, मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, बॅन्टन, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, एम.सिद्धार्थ, निखिल नाईक, अली खान.
राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), बटलर, उथप्पा, सॅमसन, स्टोक्स, जोफ्रा आर्चर, यशस्वी जैस्वाल, मनन व्होरा, कार्तिक त्यागी, आकाश सिंग, ओशेन थॉमस, अँड्रय़ू टाय, मिलर, टॉम करण, अनिरुद्ध जोशी, श्रेयस गोपाल, रियान पराग, वरुण ऍरोन, शशांक सिंग, अनुज रावत, महिपाल लोमरोर, मयांक मार्कंडे.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.