धावगती सरस, तरीही दिल्लीला उर्वरित तिन्ही सामने जिंकणे क्रमप्राप्त, सातत्याचा अभाव ही मुख्य चिंता
नवी मुंबई / वृत्तसंस्था
आयपीएल प्ले-ऑफ शर्यतीत कायम राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला आज (बुधवार दि. 11) राजस्थान रॉयल्सविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक असेल. या हंगामात दिल्लीने आपली सरासरी सरस राखली असली तरी 11 सामन्यात आतापर्यंत 6 पराभव पत्करले असल्याने त्यांना उर्वरित तिन्ही लढती जिंकणे भाग असणार आहे. आजची लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाईल.
मंगळवारच्या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ 10 गुणांसह पाचव्या स्थानी विराजमान होता. मात्र, सनरायजर्स हैदराबाद व पंजाब किंग्स हे संघ देखील प्रत्येकी 10 गुणांसह समसमान स्तरावर असल्याने दिल्लीसमोर बाका प्रसंग आहे. दिल्ली कॅपिटल्स सातत्य राखू शकलेला नाही आणि हीच त्यांची मुख्य चिंता आहे. सनरायजर्सविरुद्ध विजय संपादन केल्यानंतर त्यांचा चेन्नईने तब्बल 91 धावांनी धुव्वा उडवला होता. डेव्हॉन कॉनवेने त्यांच्या गोलंदाजांची केलेली धुलाई निव्वळ लक्षवेधी होती.
फिरकीपटू कुलदीप यादवने उत्तम गोलंदाजी केली असली तरी मागील दोन लढतीत मात्र त्याची बरीच धुलाई झाली आहे. आघाडीचा जलद गोलंदाज ऍनरिच नोर्त्झेला देखील अद्याप अपेक्षित प्रभाव टाकता आलेला नाही. खलील अहमद किफायतशीर गोलंदाजी करत आला असून अक्षर पटेलने चुणूक दाखवली आहे. फलंदाजीत डेव्हिड वॉर्नरने चौफेर फटकेबाजी केली असली तरी त्याला सहकारी सलामीवीरांकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही. दिल्लीने यंदा वॉर्नरच्या साथीला पृथ्वी शॉ, मनदीप सिंग, श्रीकर भरत असे अनेक पर्याय आजमावले आहेत. रिषभ पंतचा खराब फॉर्म ही देखील या संघाची आणखी एक चिंता आहे.
संभाव्य संघ
दिल्ली कॅपिटल्स ः रिषभ पंत (कर्णधार), अश्विन हेब्बार, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, पृथ्वी शॉ, रोव्हमन पॉवेल, ऍनरिच नोर्त्झे, चेतन साकरिया, खलील अहमद, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजूर रहमान, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, ललित यादव, मिशेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सर्फराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, केएस भरत, टीम सेफर्ट.
राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेतमेयर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, यजुवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेड मकॉय, अनुनय सिंग, कुलदीप सेन, करुण नायर, धुव जुरेल, तेजस बरोका, कुलदीप यादव, शुभम गरवाल, जेम्स नीशम, नॅथन कोल्टर-नाईल, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, डॅरेल मिशेल.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
बॉक्स
सरस धावसरासरीमुळे राजस्थान रॉयल्सचा संघ निश्ंिचत
राजस्थान रॉयल्सचा संघ 14 गुणांसह तिसऱया स्थानी असून त्यांना प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी केवळ 2 विजय आवश्यक आहेत. राजस्थानची धावगती देखील 0.326 अशी उत्तम असून एखाद्या परिस्थितीत उर्वरित दोन्ही सामने गमवावे लागले तर ही सरासरी त्यांच्यासाठी उपयुक्त ठरु शकते.
यंदा आयपीएलमध्ये सहभागी सर्व संघांमध्ये राजस्थानची गोलंदाजी सर्वोत्तमपैकी एक असून 14.50 च्या सरासरीने 22 बळींसह यजुवेंद्र चहल अव्वलस्थानी आहे. याशिवाय, त्याला रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा यांची समयोचित साथ लाभत आली आहे. ऑरेंज कॅप होल्डर जोस बटलरवर सर्वस्वी अवलंबून नाही, ही या संघाची सर्वात जमेची बाजू आहे. युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने पंजाब किंग्सविरुद्ध धडाकेबाज अर्धशतक झळकावत आपली उपयुक्तता अधोरेखित केली आहे. कर्णधार संजू सॅमसन व देवदत्त पडिक्कल यांना मात्र आणखी जबाबदारीने खेळावे लागेल. रॉयल्सला या लढतीत शिमरॉन हेतमेयरची गैरहजेरी जाणवू शकते. हेतमेयर आपल्या अपत्याच्या स्वागतासाठी गयानाला परतला आहे. राजस्थान-दिल्ली यांच्यात पहिल्या फेरीतील लढतीत नोबॉलचा वाद झडला होता. त्या आठवणीलाही या निमित्ताने उजाळा मिळाला आहे.