18 वर्षांपूर्वी पाकमधून आलेल्या नीता विजयी
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानच्या 97 वर्षीय विद्यादेवी यांची सीकर जिल्हय़ातील पुरानाबास ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवड झाली आहे. त्या राज्यातील सर्वात वयोवृद्ध सरपंच ठरल्या आहेत. तर टोंक जिल्हय़ाच्या नटवाडा ग्रामपंचायतमध्ये 18 वर्षांपूर्वी पाकिस्तानातून आलेल्या नीता कंवर यांची सरपंचपदी निवड झाली आहे. तर सीकरच्या सुचित्रा गढवाल (21 वर्षे) यांनीही लालासी गावचे सरपंचपद पटकाविले
आहे.
विद्यादेवी यांनी पहिल्यांदाच सरपंचपदाची निवडणूक लढविली आहे. त्यांचे सासरे सुभेदार सेदूराम 20 वर्षे सरपंच राहिले होते. तसेच त्यांचे पती मेजर शिवराम सिंग हे एकदा सरपंच म्हणून निवडून आले होते. तर मुलगा रामकृष्ण सिंग यांनी दोनवेळा सरपंचपद पटकाविले होते. तर सद्यकाळात त्यांचा नातू मोंटु कृष्णानिया हा नीमकाथाना नगरपालिकेत नगरसेवक आहे.
आरोग्यविषयक कुठलाच त्रास नसून प्रतिदिन कित्येक किलोमीटर पायी चालू शकते. गावातील सर्व विधवांना निवृत्तिवेतन मिळवून देण्याचे काम करणार आहे. क्षेत्रातील प्रत्येक घरात पाण्याचा पुरवठा व्हावा असा प्रयत्न राहणार आहे. तसेच रस्त्यांची निर्मिती आणि स्वच्छतेवरही भर देणार असल्याचे 97 वर्षीय विद्यादेवींनी म्हटले आहे.
टोंक जिल्हय़ाच्या नटवाडा येथे नीता कंवर यांनी पहिल्यांदाच सरपंचाची निवडणूक जिंकली आहे. 2001 मध्ये पाकिस्तानातून त्या जोधपूर येथे आल्या होत्या. नीता यांनी 2005 मध्ये सैफिया महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण प्राप्त केले होते. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यावर 5 महिन्यांपूर्वी सप्टेंबर 2019 मध्येच त्यांना भारताचे नागरिकत्व प्राप्त झाले होते.