नवी दिल्ली
सोने संशोधन आणि उत्खनन कंपनी राजेश एक्स्पोर्टला जर्मनीकडून सोन्यांची आभूषणे बनविण्यासाठीचे जवळपास 1,352 कोटी रुपयाचे कंत्राट मिळाले आहे. अशी माहिती कंपनीने बुधवारी दिली आहे. राजेश एक्स्पोर्टला कोविडनंतर हे एक मोठे आणि महत्वाचे कंत्राट मिळाले आहे. या कंत्राटांतर्गत कंपनी जर्मनीत आभूषण विक्री केंद्रांची साखळी स्थापन करणार आहे. सदरचे कंत्राट कंपनीला 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण करावे लागणार असल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद असल्यामुळे या कंत्राटाच्या कार्यवाहीत अडथळा निर्माण झाला होता, अशीही माहिती मिळाली आहे. मात्र यापुढे ते सुरळीत पार पडण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन कंपनीच्या वतीने करण्यात आले.