ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम – मेदवेदेव्ह, सित्सिपस, जेनिफर ब्रॅडी, मुचोव्हा उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ मेलबर्न
रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हने आपल्याच देशाच्या आंद्रे रुबलेव्हचा कडवा प्रतिकार मोडून काढत ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरीत स्थान मिळविले. महिलांमध्ये अग्रमानांकित ऍश्ले बार्टीचे जेतेपदाचे स्वप्न भंगले असून तिला झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हाने उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का दिला तर अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीने आपल्याच देशाच्या जेसिका पेगुलाचा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. बार्टीप्रमाणे पुरुष एकेरीत स्पेनच्या राफेल नदालचे 21 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याचे स्वप्नही भंगले असून त्याला ग्रीकच्या सित्सिपसने पराभूत केले.
चौथे मानांकन असलेल्या मेदवेदेव्हने आठव्या मानांकित रुबलेव्हचा 7-5, 6-3, 6-2 असा पराभव केला. त्याचा हा सलग 19 वा विजय आहे. उपांत्य फेरीत त्याची लढत पाचवा मानांकित ग्रीकच्या स्टेफानोस सित्सिपसाशी होईल. उष्ण वातावरणामुळे मेदवेदेव्ह व रुबलेव्ह दोघांनाही खूप थकवा आल्याने त्यांना पायात गोळे येण्याचा त्रास सहन करावा लागला. ‘शेवटच्या तीन गुणांवेळी सर्व्हिसची तयारी करीत होतो तेव्हा मला डावा पाय हलवताही येत नव्हता,’ असे त्याने सांगितले. ‘मी त्याला दीर्घ काळापासून जाणत असल्याने त्याच्या खेळाची मला ओळख झाली आहे आणि त्याचे मोठे फटके कसे निर्धोक करायचे, याची मला जाणीव होती. अलीकडच्या काळातील माझा हा सर्वोत्तम सामन्यांपैकी एक होता, असे मला निश्चितपणे वाटते. रुबलेव्ह खरोखरच खूप छान खेळत होता. त्याला हरविण्यात मी यशस्वी ठरलो, हे अविश्वसनीयच वाटते,’ असेही मेदवेदेव्ह म्हणाला.
गेल्या नोव्हेंबरमध्ये पॅरिस 1000, लंडनमधील एटीपी फायनल्स आणि रशिया संघातून खेळलेली एटीपी चषक स्पर्धा इथपासून त्याची 19 विजयी सामन्यांची घोडदौड सुरू झाली आहे. येथील स्पर्धेत तो पहिल्यांदाच उपांत्य फेरीत खेळणार असून यापूर्वी 2019 च्या अमेरिकन ओपन स्पर्धेत त्याने अंतिम फेरीपर्यंत आणि मागील वर्षी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती रुबलेव्हने याआधी तीन ग्रँडस्लॅममध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती आणि यावेळीही त्याला ही फेरी पार करण्यात यश आले नाही.
स्पेनच्या राफेल नदालचे आव्हानही उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले असून त्याला ग्रीकच्या स्टेफानोस सित्सिपसने पाच सेट्सच्या झुंजीत 3-6, 2-6, 7-6 (7-4), 6-4, 7-5 असे नमवित उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्याची उपांत्य लढत रशियाच्या मेदवेदेव्हशी होणार आहे. पाच दिवसांचे लॉकडाऊन संपल्याने गुरुवारपासून प्रेक्षकांना पुन्हा दिला जाणार आहे.
ऍश्ले बार्टीचा स्वप्नभंग
जागतिक अग्रमानांकित ऑस्ट्रेलियाच्या बार्टीचे मायदेशातील स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न झेकच्या 25 व्या मानांकित मुचोव्हाने उधळून लावले. यापूर्वी 1978 मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेत स्थानिक महिला टेनिसपटूने जेतेपद पटकावले होते. येथील सामन्यात मुचोव्हाने बार्टीवर 1-6, 6-3, 6-2 अशी मात केली. पहिला सेट गमविल्यानंतर दुसऱया सेटवेळी मुचोव्हाने उपचार करवून घेण्यासाठी टाईमआऊट घेतले होते. त्यानंतर मात्र तिच्या खेळात बदल झाला आणि जोरदार मुसंडी मारत नंतरचे दोन्ही सेट जिंकून पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. या स्पर्धेत अग्रमानांकित बार्टीविरुद्ध सेट जिंकणारी मुचोव्हा ही पहिली खेळाडू बनली आहे. अमेरिकेच्या 22 व्या मानांकित जेनिफर ब्रॅडीशी तिची उपांत्य लढत होणार आहे. दुसऱया उपांत्यपूर्व सामन्यात बिग सर्व्हिससाठी ओळखल्या जाणाऱया जेनिफर ब्रॅडीने मुचोव्हाप्रमाणे एका सेटच पिछाडी भरून काढत जेसिका पेगुलाचा 4-6, 6-2, 6-2 असा पराभव करून शेवटच्या चारमध्ये आगेकूच केली. ब्रॅडीने या सामन्यात 7 बिनतोड सर्व्हिस केल्या. ब्रॅडी व पेगुला या जीवलग मैत्रिणी आहेत. पण सामन्यावेळी मैत्री बाजूला ठेवत त्यांनी व्यावसायिक वृत्तीने खेळ केला. पेगुलाचे अब्जाधीश वडील हे एनएफएलमधील बफेलो बिल्स या संघाचे मालक आहेत.