ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ स्व. ॲड. रावसाहेब शिंदे यांचा स्मृतीदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार दिनांक 29 जानेवारी रोजी आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री डाॅ. राजेश टोपे, साहित्य अकादमी परस्कारप्राप्त ज्येष्ठ कवियित्री अनुराधा पाटील आणि कृषितज्ज्ञ विलास शिंदे यांना यंदाचा स्व.रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर आणि अध्यक्ष उद्धव कानडे यांनी कळवली आहे.
शुक्रवार दिनांक 29 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी 5.30 (साडेपाच) वाजता एस.एम.जोशी सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी भूषविणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुुन राज्याचे सहकार, कृषी आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री डाॅ. विश्र्वजीत कदम आणि डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी.पाटील उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत मधुकर भावे आणि डाॅ. राजीव रावसाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.
डाॅ. राजेश टोपे यांना आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी, ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आणि कृषितज्ज्ञ आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसरचे विलास शिंदे यांना कृषि क्षेत्रातील कार्यासाठी यंदाचा ॲड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रत्येकी रुपये पाच हजार, महात्मा फुले सत्यशोधकीय फेटा आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी डाॅ. संभाजी मलघे यांनी संपादीत केलेल्या उद्धव कानडे यांची चिंतनशील कवीता ‘समतेचा ध्वज’ या ग्रंथाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.