वृद्धाश्रम, अनाथालये, डायलिसिस उपचारांसाठी मदत जाहीर
प्रतिनिधी / पणजी
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 71 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आणि त्यांना दीर्घायुष्य आणि आनंदाच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या संदेशात राज्यपालांनी, राष्ट्रसेवेसाठी आणि लोककल्याणासाठी समर्पित असा द्रष्टा नेता लाभल्याने देश धन्य आहे. त्यांनी कोविड 19 महामारीच्या उत्तम व्यवस्थापनासाठी आणि आत्मनिर्भर भारत या संपूर्ण विकसित भारताच्या कल्पनेसाठी पंतप्रधानाचे कौतुक केले.
वृद्धाश्रम, अनाथालयांना मदत
राज्यपालांनी यावेळी 71 वृद्धाश्रम, अनाथालये आणि अशा इतर संस्थांना आर्थिक मदत जाहीर केली. तसेच 71 व्यक्तींना राज भवनातून डायलिसिस उपचारांसाठी राज्यपालांच्या डिस्क्रेशनरी फंडातून आर्थिक मदत घोषित केली. इच्छुक व्यक्ती, संस्थांनी सर्व तपशीलांसह अर्ज करावा. डायलिसिस उपचारांच्याबाबतीत ज्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत त्या रुग्णालयांचा उल्लेख करावा. अर्ज राज्यपालांच्या सचिवांच्या नावे 30 सप्टेंबरपूर्वी सादर करावे. प्रथम येणाऱया प्रथम तत्वावर आर्थिक साहाय्य मंजूर केले जाईल.