चार महिन्यांसाठी लेखानुदान सादर करणार : उपसभापती पदासाठीची निवडणूकही आज
प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज इ.स. 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचे नियोजन तथा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करणार आहेत. त्यानंतर ते पुढील 4 महिन्यांसाठी लेखानुदान मागण्या सादर करणार असून या मागण्यांना विधानसभेची मंजुरी मिळविणार आहेत.
राज्याच्या अत्यंत महत्त्वाचा असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अर्थमंत्री या नात्याने राज्य विधानसभेत मांडणार आहेत. आतापर्यंत त्यांनी दोन अर्थसंकल्प यापूर्वी मांडलेले आहेत. गेल्या वर्षी इ. स. 2021-22 या वर्षाकरीता 21 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडला होता. त्याचबरोबर तो निवडणूक अर्थसंकल्प होता व असंख्य योजना त्यांनी त्यात मांडल्या होत्या. आज साधारणतः 23500 कोटी रुं.चा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे.
याचबरोबर गेल्यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची कशी अंमलबजावणी केली यासंदर्भातील ‘ऍक्शन टेकन रिपोर्ट’ हा देखील डॉ. प्रमोद सावंत हे आज विधानसभेत सादर करतील. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अद्याप सहकारी मंत्र्यांना खातेवाटप देखील करायचे असताना डॉ. प्रमोद सावंत यांना केवळ 48 तासांचीच मुदत मिळाली, त्या गडबडीत ते आज राज्याचा 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करतील.
राज्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. कर्जाचा डोंगर वाढलेला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री अर्थसंकल्प पूर्ण दर्जाचा सादर करतील. मंगळवारी अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री अर्थसंकल्पासंदर्भात अधिकारीवर्गाशी चर्चा करीत बसले तसेच अर्थसंकल्पावर अखेरचा हात त्यांनी फिरविला.
आज सकाळी मंत्रिमंडळ बैठक
राज्य विधानसभेत आज उपसभापतीपदाची निवडणूक होईल. त्यानंतर मुख्य़मंत्री अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी ते मंत्रिमंडळ बैठक घेऊन मंत्र्यांशी चर्चा करतील व त्यानंतर अर्थसंकल्प मांडतील.