लक्ष्मण सवदी यांची संरक्षण मंत्र्यांकडे पत्राद्वारे विनंती
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातही डीआरडीओच्यावतीने विशेष कोविड चिकित्सा केंद्र सुरू करावेत, अशी विनंती उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दिल्ली, वाराणसी आणि लखनौ या शहरांमध्ये डीआरडीओच्यावतीने विशेष कोविड चिकित्सा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याच धर्तीवर कर्नाटकातही कोरोना रुग्णांसाठी उपचाराची व्यवस्था करावी, बेळगाव आणि बेंगळूरमध्ये संरक्षण खात्याची खुली जागा आहे. याचा वापर करून विशेष चिकित्सा कोविड केंद्रे सुरू केल्यास अनेक रुग्णांना उपचार घेण्यास अनुकुल होईल, असे सवदी यांनी राजनाथसिंग यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
सध्या कर्नाटकातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. इस्पितळांमध्ये कोरोना रुग्णांची गर्दी झाली आहे. त्यामुळे डीआरडीओच्यावतीने कोविड चिकित्सा केंद्रे सुरू करणे योग्य ठरेल. संरक्षण खात्याची बेळगाव आणि बेंगळूरमध्ये खुली जागा असून त्याचा वापर करता येईल. याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंतीही सवदी यांनी केली आहे.