दिवसभरात 11,958 नवे बाधित : सक्रिय रुग्णसंख्या 2.38 लाखावर
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात मागील पाच दिवसांपासून नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात सोमवारी 11,958 बाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 340 रुग्णांचा बळी गेला आहे. तर मागील चोवीस तासांत 27,299 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचारातील रुग्णसंख्या 2,38,324 पर्यंत खाली आली आहे.
राज्यात सोमवारी 1,31,553 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण 9.08 टक्के इतके आहे. तर मृत्यूचा दर 2.84 टक्के आहे. राज्यात ऑक्सिजनवर अवलंबून असणाऱया कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना देखील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात अद्याप यश आलेले नाही.
राज्यात आतापर्यंत केलेल्या एकूण 3,07,32,003 कोविड चाचण्यांपैकी 27,07,481 चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील 24,36,716 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण 30,190 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
राज्यातील बेंगळूर शहर जिल्हय़ात सोमवारी 1,992 नवे रुग्ण आढळले आहेत. तेथील लोकसंख्येच्या मानाने ही रुग्णसंख्या अत्यंत कमी आहे. तर म्हैसूर जिल्हय़ात दिवसभरात 1,213, हासनमध्ये 1,108, शिमोगा 1,224, मंगळूर 408, मंडय़ा 597, तुमकूर 420, उडुपी 394, दावणगेरे 380, कारवार 364, बेळगाव 355, चिक्कमंगळूर जिल्हय़ात 365 नव्या बाधितांची भर पडली आहे. उर्वरित जिल्हय़ांमध्ये 300 पेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.