गृहमंत्री बसवराज बोम्माई यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
देशातील काही राज्यांमध्ये रात्रीचा कर्फ्यू जारी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे कर्नाटकातही तसा निर्णय होईल का, याबाबत जनतेमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. परंतु, राज्यात रात्रीच्या वेळी कर्फ्यू जारी करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी 26 डिसेंबरपासून राज्यात आठवडाभर रात्रीचा कर्फ्यू जारी करण्याचा सल्ला तज्ञांनी राज्य सरकारला दिला आहे. शिवाय नववर्षाच्या स्वागतावेळी होणाऱया आनंदोत्सवाला परवानगी न देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात रात्रीचा कर्फ्यू जारी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार का, याबाबत शुक्रवारी होणाऱया तज्ञांच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.
कोविड तांत्रिक सल्लागार समितीने राज्यात जानेवारी, फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. शिवाय त्यावर मात करण्यासाठी काही सल्लेही सरकारला दिले आहेत. दरम्यान, गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी गुरुवारी उडुपी येथे प्रतिक्रिया देताना राज्यात रात्रीचा कर्फ्यू जारी करण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय याबाबत अधिक चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.