राधानगरी / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेची २३ वी वरिष्ठ महिला राज्य अजिंक्य पद कुस्ती स्पर्धा सातारा येथे सपंन्न झाल्या त्यामध्ये कोल्हापूर शहर संघाचे प्रतिनिधीत्व करताना राधानगरीची पै आलीशा अशोक कांबळे हिने ५५ कि . वजनी गटात कांस्य पदक मिळवून राधानगरीसह जिल्ह्याचे नावलौकिक केले.
आलीशाने पहिल्यापासून आक्रमक कुस्त्या करत मुळी व बांगडी आशा डावात भर पाडून प्रेक्षकांची मने जिंकली व अनेक कुस्त्या चितपट करून काढल्या असून तिला कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले आहे. आलीशा कांबळे हिने शालेय कुस्ती स्पर्धेतून सुरवात करत आज तिने राष्ट्रीय पातळीपर्यंत मोठी झेप घेतली आहे. यासाठी तीने जिद्द, चिकाटी आणी अपार मेहनत घेतली आहे.
घरची परिस्थीती अगदीच हालाखीची आहे. राधानगरीमध्ये हाँटेल व्यवसाय कमीअधीक प्रमाणात होत असल्याने परवड होत आहे. तिच्या आहारासाठी कधीकधी तजविज करताना नाकीनऊ येत असे. अशाही कठीण परिस्थीतीत आपले ध्येय उराशी बाळगून कुस्तीत आपल्याला पदक मिळवायचेच या हेतूने आईवडील व मार्गदर्शकांच्या पाठबळावरच हे यश प्राप्त केले हे वाखाणण्यासारखे आहे.
राधानगरीचे नाव राज्यभर पोहचवणाऱ्या आलीशाला गरज आहे ती मदतीची. समाजामध्ये अनेक दातृत्व करणाऱ्या व्यक्तीनी व संस्थानी पुढे येऊन खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी तिला आर्थीक मदत करावी किंवा दत्तक घेऊन तिच्या कुस्तीतील आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होण्यासाठी मदत करणे जरूरीचे आहे. तिच्या या यशाचे कौतूक होताना अनेक ठिकाणी सत्कार होत आहेत.