अयोध्या
अयोध्येत उभारण्यात येणाऱया भव्य राममंदिरादरम्यान आता रामभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. अयोध्येत येणारे भाविक रामलल्लाचे दर्शन करण्यासह आता त्याच्या सायं आरतीतही सहभागी होऊ शकतील. याकरता श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट पास प्रदान करणार आहे.
रामलल्लाच्या आरतीत सामील होण्यासाठी केवळ 30 भाविकांना अनुमती देण्यात येणार आहे. भाविकांना पास प्राप्त करण्यासाठी ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. भाविकांना पास प्राप्त केल्यावर संध्याकाळी 6 वाजता श्रीरामजन्मभूमी परिसरात प्रवेश मिळेल आणि 15 मिनिटांपर्यंत भाविक भगवान श्रीराम यांच्या बालरुपाचे दर्शन करण्यासह आरतीत सामील होऊ शकतील अशी माहिती ट्रस्टच्या कार्यालयाचे प्रभारी प्रकाश यांनी यांनी दिली आहे. सध्या केवळ 30 भाविकांनाच आरतीत सामील होण्याची अनुमती देण्यात येणार आहे. पुढील काळात भाविकांची संख्या वाढविण्यासंबंधी ट्रस्ट निर्णय घेणार आहे.