अयोध्या / वृत्तसंस्था :
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने अयोध्येच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी 12 वाजून 07 मिनिटांनी खाते उघडले आहे. रामलल्लाच्या मूर्तीसमोरील दानपेटीतील रक्कम या खात्यात जमा केली जाणार आहे. या दानपेटीतील रकमेची गणना ट्रस्टच्या पदाधिकाऱयांनी सुरू केली आहे.
राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना केल्याच्या महिन्यानंतर श्री राम जन्मभूती तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नावाने एसबीआयमध्ये खाते उघडण्यात आले आहे. हे नवे खाते फैजाबाद येथील एसबीआयमधील 27 वर्षे जुन्या खात्याची जागा घेणार आहे. बाबरी मशिद पाडविण्यात आल्यावर राम मंदिर उभारणीसाठी भाविकांकडून मिळणाऱया देणगीकरता हे खाते उघडण्यात आले होते. जुने खाते विभागीय आयुक्त हाताळत असून यात 10 कोटीची रक्कम जमा आहे. ही रक्कम नव्या खात्यात हस्तांतरित केली जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी दिली आहे.
एसबीआयमधील नवे खाते गोविंदगिरी महाराज, चंपत राय आणि अनिल मिश्रा हे ट्रस्टचे तीन सदस्य हाताळणार आहेत. प्रक्रियेनुसार जिल्हा कोषागार अधिकारी, एसबीआयचे अधिकारी, कार्यकारी न्यायदंडाधिकारीकडून दर 15 दिवसांनी खात्यात जमा देगणीचा आढावा घेणार आहेत. सोन्याच्या स्वरुपातील देगणीचे मूल्य निर्धारित करुन ते लॉकरमध्ये ठेवले जाणार आहे.
बँकेतील व्यवहार तसेच प्रस्तावित मंदिरासाठीच्या खर्चांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी गोविंदगिरी महाराजांकडे असणार आहे. या कार्यात विहिंपचे उपाध्यक्ष चंपत राय तसेच डॉ. अनिल मिश्रा यांना सहाय्य करणार आहेत. प्रस्तावित मंदिराचा डिजिटल स्वरुपातील आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मांडण्याचा निर्णय ट्रस्टच्या निर्मिती समितीचे अध्यक्ष निवृत्त अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांनी घेतला आहे. 25 मार्चपूर्वी डिजिटल स्वरुपातील आराखडा तयार केला जाणार आहे. 25 मार्चनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येचा दौरा करू शकतात.
तर धन्नीपुरमध्ये मशिदीसाठी ट्रस्टच्या घोषणेपूर्वीच वाद सुरू झाला आहे. ट्रस्टची घोषणा सुन्नी मध्यवर्ती वक्फ मंडळाकडून होणार आहे. पण तत्पूर्वी बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अंसारी यांनी मंडळाच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ट्रस्टच्या स्थापनेच्या बैठकीत पक्षकारांना बोलाविण्यात आलेले नाही असा दावा अंसारी यांनी केला आहे.