वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
28 जुलैपासून सुरू होणाऱया बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचा स्क्वॅश संघ जाहीर करण्यात आला असून त्यात 14 वर्षीय अनाहत सिंगला स्थान देण्यात आले आहे.
दिल्लीच्या अनाहत सिंगने 15 वर्षाखालील वयोगटातील विविध स्पर्धांत चमकदार प्रदर्शन केल्यामुळे तिची या संघात निवड झाली आहे. अलीकडेच जर्मनीत झालेल्या स्पर्धेत तिने जेतेपद मिळविले आणि जूनमध्ये झालेल्या यू-15 आशियाई स्पर्धेतही तिने अजिंक्यपद पटकावले आहे. अनाहतशिवाय राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणाऱयांत वेलावन सेंथिलकुमार, अभय सिंग यांचा समावेश असून ते पुरुष दुहेरीत खेळतील. सौरव घोषाल, जोश्ना चिन्नप्पा, दीपिका पल्लिकल या संभाव्य पदकविजेत्यांचाही या संघात समावेश आहे. जुळय़ा मुलांना जन्म दिल्यानंतर सहा महिन्यांनी एप्रिलमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दीपिकाने सौरव व जोश्नासमवेत दुहेरीची अजिंक्यपदे मिळविली होती. यावेळी तिच्याकडून मिश्र व महिला दुहेरीत सुवर्णपदकांची अपेक्षा केली जात आहे. आठ वर्षापूर्वी ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत दीपिका व जोश्ना यांनी महिला दुहेरीचे सुवर्ण जिंकून ऐतिहासिक यश मिळविले होते.
चार वर्षापूर्वी गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या स्पर्धेत या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. याशिवाय मिश्र दुहेरीत सौरवसमवेतही तिला रौप्यपदक मिळाले होते. दीपिकाने अजून एकेरीत खेळायला सुरुवात केलेली नाही. स्क्वॅशमधील पॉवरहाऊस असलेल्या इजिप्तचा अपवाद वगळता जगातील अव्वल स्क्वॅश संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांचा समावेश आहे. हरिंदर पाल संधूही दुखापतीतून पूर्ण बरा झाला असून त्यालाही या संघात स्थान मिळाले आहे.
राष्ट्रकुलसाठी स्क्वॅश संघ ः एकेरी-सौरव घोषाल, रमित टंडन, अभय सिंग, जोश्ना चिन्नप्पा, सुनयना कुरुविला, अनाहत सिंग. महिला दुहेरी-दीपिका पल्लिकल-जोश्ना चिन्नप्पा. मिश्र दुहेरी-सौरव घोषाल-दीपिका पल्लिकल, रमित टंडन-जोश्ना, पुरुष दुहेरी-रमित टंडन-हरिंदर पाल सिंग, वेलावन सेंथिलकुमार-अभय सिंग. विदेशी प्रशिक्षक-ख्रिस्तोफर वॉकर, संघव्यवस्थापक-सायरस पोंचा, फिजिओ-ग्रीम एव्हेरार्ड.