शिवा नरवाल यांना पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक
वृत्तसंस्था/ चांगवॉन, कोरिया
भारताच्या मेहुली घोष व तुषार माने यांनी येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक मिळवून देताना 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात पहिले स्थान मिळविले. याशिवाय पलक व शिवा नरवाल यांनी सांघिक पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक पटकावले.
10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजीत पलक व शिवा नरवाल यांनी तिसऱया स्थानासाठी झालेल्या प्लेऑफमध्ये कझाखस्तानच्या इरिना लोक्तिओनोव्हा व व्हॅलेरी रखिमझान यांच्यावर 16-0 अशी एकतर्फी मात करीत कांस्यपदक निश्चित केले. त्याआधी फॉर्ममध्ये असलेल्या मेहुली घोष व तुषार शाहू माने यांनी 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजीत हंगेरीच्या एस्त्झर मेझारोस व इस्तवान पेन यांचा 17-13 अशा फरकाने पराभव करून सुवर्णपदक पटकावले. या प्रकारात तिसरे व चौथे स्थान अनुक्रमे इस्रायल व झेक प्रजासत्ताकच्या नेमबाजांनी मिळविले. तुषारचे हे वरिष्ठ स्तरावरील पहिलेच सुवर्णपदक असून मेहुलीचे हे दुसरे सुवर्ण आहे. यापूर्वी 2019 मध्ये काठमांडूत झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्ण जिंकले होते.
भारताने 2 सुवर्ण व एक कांस्यपदकासह पदकतक्त्यात दुसरे स्थान मिळविले असून सर्बिया पहिल्या स्थानावर आहे. सर्बियानेही तीन पदके मिळविली असून तिन्ही सुवर्णपदके आहेत. 2 सुवर्णपदके मिळवित चीन तिसऱया स्थानावर आहे. अर्जुन बबुताने येथील स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.