काँग्रेसचे पदवीधर शिक्षण विभागाचे राज्य सचिव एन. बी. बन्नूर यांचा आरोप
प्रतिनिधी /बेळगाव
नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्य सरकारने लागू केले आहे. केवळ देशभरात आपण प्रथम हे धोरण लागू केले असा टेंभा मिरवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही चर्चा, तज्ञांची मते न घेता सरसकट धोरण लागू करण्यात आले. या धोरणाच्या आडून भाजप आपल्या पक्षाचा प्रचार करत असल्याचा आरोप कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे पदवीधर शिक्षण विभागाचे राज्य सचिव एन. बी. बन्नूर यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
वायव्य शिक्षक संघाची निवडणूक जवळ आली असल्याने भाजपचे सदस्य राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर शिक्षकांसाठी चर्चासत्रांचे आयोजन करत आहेत. या चर्चासत्रांमध्ये शिक्षकांकडे मतांचा जोगवा मागितला जात आहे. प्रत्यक्षात शैक्षणिक धोरण राबवताना अनेक चुका करण्यात आल्या आहेत. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांची अवस्था दयनीय झाली असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या राज्यातील शिक्षणाचा गाडा अतिथी शिक्षकांच्या खांद्यावर टाकण्यात आला आहे. या सर्व चुका लपविण्यासाठी शैक्षणिक धोरणाचा उदो उदो केला जात असल्याचा घणाघात करण्यात आला.
शिक्षकांना नवी पेन्शन लागू करण्यात आली खरी परंतु यामुळे शिक्षकांचे नुकसान होत आहे. हरियाणा, तेलंगणा, राजस्थान यासारख्या राज्यांनी जुनीच पेन्शन लागू केली असताना राज्य सरकार मात्र उदासीन आहे. या विरोधात प्रत्येक तालुक्मयात शिक्षकांचे आंदोलन उभे केले जाणार असल्याची माहिती बन्नूरे यांनी दिली. यावेळी के. बी. हिरेमठ, ऍड. जगदीश सावंत, प्रभू शिवनायक, जी. एन. पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.