सार्वजनिक बांधकाम खात्याकडून प्रसिद्धीपत्रक जाहीर
प्रतिनिधी / बेळगाव
रिंगरोडसाठी यापूर्वी जे नोटिफिकेशन काढले होते ते चुकीच्या पद्धतीने काढले होते. त्यामुळे शेतकऱयांनी त्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्या नोटिफिकेशनला स्थगिती दिली होती. त्यामुळे पुन्हा आता रिंगरोड करण्याबाबत हालचाली गतिमान झाल्या असून सार्वजनिक बांधकाम खात्याने पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी खडबडून जागे झाले आहेत.
या रिंगरोडसाठी राज्य आणि केंद्र सरकार निधी उपलब्ध करणार आहेत. भू-संपादनासाठी 280 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामधील निम्मा खर्च राज्य सरकार तर निम्मा खर्च केंद्र सरकार करणार आहे. चार ते सहापदरी हा रस्ता होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील झाडशहापूर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील बेन्नाळी गावापर्यंतच्या रिंगरोडचा उल्लेख करण्यात आला आहे. तर एनएच 4 कमकारट्टी गावाचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी एकूण 2 हजार 792 कोटी रुपये खर्च होणार असल्याचेही म्हटले आहे.
यापूर्वी 2019 साली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आराखडा तयार केला होता. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू केली. मात्र शेतकऱयांनी जोरदार विरोध केला. याचबरोबर शेतकऱयांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली होती.