सोन्यासह रक्कम असलेली महिलेची बॅग केली परत
प्रतिनिधी /बेळगाव
दुचाकीवरून घाईगडबडीत कार्यालयाकडे जाणाऱया महिलेची बॅग रस्त्यावर पडली. सदर बॅगेमध्ये 1 लाख व 2 तोळे सोने तसेच एलआयसीची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षाचालकाने परत देऊन माणुसकी दाखविल्याची घटना सोमवारी घडली.
बेळगाव-सांबरा रोडवरील बसवण कुडची येथून गीता होनमनी या नेहमीप्रमाणे दुचाकीवरून शहापूर येथील बसवेश्वर सर्कल येथे असलेल्या एलआयसी कार्यालयाकडे त्या घाईगडबडीत दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी अचानक दुचाकीवरील त्यांची बॅग रस्त्यावर पडली. त्यावेळी तेथे असलेले रिक्षाचालक नवनाथ कुडे यांना ती बॅग सापडली. त्यांनी आरडाओरड करून गीता यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या घाईगडबडीत असल्याने थेट शहापूरला गेल्या. यावेळी बॅगमध्ये मोबाईल होता. तो मोबाईल घेऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल लॉक असल्याने शक्मय झाले नाही. दुचाकीस्वार महिला गीता या शहापूर येथील कार्यालयात जाताच त्यांना बॅग नसल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी रिक्षाचालक नवनाथ यांनी तो फोन उचलला. त्यानंतर त्यांनी आपल्याकडे बॅग आहे ती तुम्हाला द्यायची आहे. तेव्हा तुम्ही कोठे आहात ते सांगा, मी तेथे येऊन बॅग देतो, असे सांगितले. त्यावर गीता यांनी आपला पत्ता सांगितला. त्याठिकाणी नवनाथ यांनी जाऊन बॅग दिली.