ऑनलाईन टीम / वर्धा
वर्ध्यातील सेलसुराजवळ नदीच्या पुलावरुन कार कोसळून झालेल्या भीषण अपघातात आमदारपुत्रासह 7 मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गोंदियातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले याचा समावेश आहे. रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, देवळी येथून वर्ध्याला येत असताना रात्री एकच्या सुमारास सेलसुराजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार नदीच्या पुलावरून खाली कोसळली. हा पुल जवळपास 40 फूट उंच असल्याने कारचा चेंदामेंदा झाला. तसेच कारमधील 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हे सात विद्यार्थी 25 ते 35 वयोगटातील असून, एका मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
मृतांमध्ये आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार याचा समावेश आहे. तो वर्धा येथे दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचा अभ्यास करत होता. तर नीरज चौहान, नितेश सिंग, विवेक नंदन, प्रत्युश सिंग, शुभम जयस्वाल आणि पवन शक्ती अशी अपघातातील इतर मृतांची नावे आहेत.