स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केले चौघांना जेरबंद
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरालगतच पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हीस रोडवर द्विग्विजय टोयोटा शोरुमच्या समोरच रुग्णवाहिकेतून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱया चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. 9 रोजी रात्री जेरबंद केले असून त्यांच्याकडून 5 कोटी 43 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे, अशी माहिती सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे. दरम्यान, सातारा पोलीस दलाने प्रथमच मोठय़ा स्वरुपाची तस्करी उघडकीस आणली आहे. दरम्यान, सिद्धार्थ विठ्ठल लाकडे (वय 31, रा. कासारविली, जि. रत्नागिरी), अनिस इसा शेख (वय 38, रा. शिवाजीनगर हुपरी, जि. कोल्हापूर), नासिर अहमंद रहिमान राऊत (वय 40, रा. भडकंबा ता. संगमेश्वर), किरण गोविंद भाटकर (वय 50, रा. भाटीये, जि. रत्नागिरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खास खबऱयांकडून माहिती मिळाली की, राष्ट्रीय महामार्गावरुन रुग्णवाहिकेतून चार जण व्हेल माशाची उलटी घेऊन चालले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला. त्यामध्ये सिद्धार्थ लाकडे, अनिस शेख, नासिर राऊत किरण भाटकर हे चौघे अलगद जाळय़ात सापडले. त्यांच्याकडुन तब्बल रुग्णवाहिकेसह व्हेल माशाची उलटी असा सुमारे 5 कोटी 43 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. त्या चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक अरुण देवकर, एपीआय संतोष पवार, रवींद्र भोरे, पीएसआय अमित पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके, मधूकर गुरव, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, सुधीर बनकर, आतिश घाडगे, संतोष पवार, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधळे, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, अजित कर्णे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, विशाल पवार, मोहन पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, प्रवीण पवार, मयूर देशमुख, वनपरीक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण, वनपाल कुशल पावरा, वनरक्षक राजकुमार मासलगी यांनी कारवाई केली.