सौम्य, अतिसौम्य वा लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरी सोडताना काळजी घ्या! : अशा रुग्णांना सात दिवस विलगीकरण करणे गरजेचे
प्रतिनिधी / कणकवली:
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमध्ये आता सुधारित डिस्चार्ज पॉलिसी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सौम्य, अतिसौम्य वा लक्षणे नसलेल्या रुग्णांनाही घरी सोडताना पुढील सात दिवस घरी विलगीकरण करणे आवश्यक असल्याच्या सूचना देताना तसा शिक्काही हातावर मारण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. घरी सोडल्यानंतर 14 व्या दिवसापर्यंत आरोग्य कर्मचाऱयांनी दूरध्वनीद्वारे पाठपुरावा करावा व लक्षणे नसल्याची खात्री व नोंद करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्यांबाबतही डिस्चार्जसाठीच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
याबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून त्यानुसार सौम्य, अतिसौम्य व लक्षणे नसलेल्या ज्या रुग्णांना आरोग्य संस्थांमध्ये दाखल करण्यात आले असेल, त्यांचे रोज दोन वेळा शरिराच्या तापमानासाठी व पल्स ऑक्सिमीटरद्वारे spo2 तपासणी करण्यात यावी. रुग्णाला लक्षणे सुरू झाल्यापासून 7, 8 व 9 व्या दिवशी ताप नसल्यास दहाव्या दिवशी तपासणी करून घरी सोडण्यात यावे. या रुग्णांना घरी सोडत असताना कोविड विषाणूसाठी प्रयोगशाळा तपासणीची आवश्यकता नाही. डिस्चार्ज रुग्णांना घरी विलगीकरण पुढील सात दिवसांसाठी करणे आवश्यक असल्याच्या सूचना देण्यात याव्यात. रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्या हातावर 7 दिवसांचा स्टॅम्प मारण्यात यावा. या रुग्णांमध्ये दाखल असताना डिस्चार्ज करण्यापूर्वी ऑक्सिजनचे प्रमाण 95 टक्केपेक्षा कमी आढळून आल्यास रुग्णांना कोविड हेल्थ सेंटरला संदर्भित करण्यात यावे. या रुग्णांना पुन्हा ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळून आल्यास जवळचे कोविड सेंटर अथवा राज्याच्या 104 या टोल फ्री क्रमांकावर कळविण्यात यावे.
मध्यम लक्षणे असलेले रुग्ण म्हणजे कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल आहेत, त्यांच्यासाठी ज्या रुग्णांना तीन दिवस लक्षणे नाहीत आणि त्यांचे रुम एअरवर ऑक्सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण पुढील चार दिवसांसाठी 95 टक्केपेक्षा अधिक आहे, अशांसाठी रुग्णांच्या शरिराच्या तापमानासाठी तसेच ऑक्सिजन सॅच्युरेशनसाठी तपासणी करावी. अशांना लक्षणे सुरू झाल्यापासून 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर डिस्चार्ज द्यावा. डिस्चार्ज देताना तापासाठीची कोणतीही औषधे न घेता, रुग्णाला ताप नसणे, श्वास घेण्यासाठी त्रास न होणे, ऑक्सिजन पुरवठा करण्याची आवश्यकता नसणे या बाबी पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यांच्यासाठी घरी पाठविताना प्रयोगशाळा तपासणीची आवश्यकता नाही. अशांनाही घरी सोडल्यानंतर सात दिवस घरी विलगीकरण ठेवण्याच्या सूचना द्यायच्या आहेत.
गंभीर रुग्ण, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण अशांना घरी पाठविताना त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून न येणे. RT-PCR पद्धतीने लक्षणे नसलेल्या रुग्णांचा एक नमुना निगेटिव्ह येणे आवश्यक आहे. रुग्णांची RT-PCR तपासणी लक्षणे कमी झाल्यानंतर करण्यात यावी. सर्व रुग्णांना डिस्चार्ज करताना लक्षणे आढळून आल्यापासून डिस्चार्ज करण्यासाठीचा कालावधी किमान दहा दिवस आहे, याची खात्री करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.