प्रतिनिधी /फातोर्डा
दवर्ली रुमडामळमध्ये कचरा ही सर्वांत मोठी समस्या आहे. हाऊसिंग बोर्ड वाढत आहे. कुटुंबे वाढत आहेत. बेकायदेशीर बांधकामे वाढत आहेत. कित्येकांनी भाडेकरू ठेवले आहेत. या सर्वांमुळे कचरा वाढतो आणि हा सगळा कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जातो. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सुरुवात स्वतःपासून करायला हवी. त्यादृष्टीने दवर्ली रुमडामळ पंचायतीने एक चांगले पाऊल उचलले आहे. ही पंचायत लहान असली, तरी त्यांचे प्रयत्न खूप मोठे आहेत. 2 टन कचरा हाताळण्याची क्षमता असलेले मोठे यंत्र त्यांनी आणले आहे. यामध्ये कचरा विभक्त करणे, त्यातील पाणी शोषणे अशी वेगवेगळी यंत्रणा आहे, असे नावेलीचे तत्कालीन आमदार लुईझिन फालेरो यांनी सांगितले.
दवर्ली रुमडामळ पंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून कचरा प्रकल्पासाठी आणलेल्या यंत्रणेचा उद्घाटन सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच अविता चोडणकर, उपसरपंच मधुकला शिरोडकर, पंच समुल्ला फणिबंद, विनायक वळवईकर, विश्वदास नाईक, इशा नाईक, सोफिया शेख, सचिव प्रसिला नियासो, जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर, भाजप नेते उरफान मुल्ला, गटविकास अधिकारी व इतर उपस्थित होते. पुढे बोलताना फालेरो यांनी प्रत्येक घरातील ओला व? सुका कचरा वर्गीकरण करून गोळा करावा, असा सल्ला दिला.
जि. पं. सदस्य तुयेकर यांनी पंचायतीला या कार्याबद्दल शाबासकी दिली. सरकारच्या पैशांचा चांगला उपयोग केल्याचे त्यांनी सांगितले. कचरा उचलणाऱया कामगारांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. उरफान मुल्ला म्हणाले की, पंचायतीने केलेला पैशांचा योग्य उपयोग अभिनंदनीय आहे. यामुळे ग्रामस्थांना कचरा समस्येपासून दिलासा मिळणार आहे.
सरपंच चोडणकर यांनी स्वागत केले. यावेळी त्या म्हणाल्या की, या कचरा यंत्रणेसाठी 70 लाख रु. खर्च करण्यात आले आहेत. चौदाव्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून हा कचरा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. आता त्याचे उद्घाटन झाले असले, तरी गेला एक महिना या यंत्राची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. यामुळे कचऱयाची समस्या 99 टक्के कमी होणार आहे. यासाठी फालेरो, जि. पं. सदस्य तुयेकर, गटविकास अधिकारी, सर्व पंच, सचिव यांची पुरेपूर मदत लाभल्याचे त्यांनी सांगितले.