मतदारसंघात कोट्यवधीच्या कामांची भरारी
फिरोज मुलाणी / औंध :
बालपण कडक शिस्तीत चार भिंतीच्या आत गेलेल्या आणि राजकारणातील माहिती नसलेल्या वडगांव (ज. स्वा.) येथील माजी सभापती रेखा घार्गे यांनी मतदारसंघातील विकासकामात कोटय़वधीची भरारी घेतली आहे. बातमी वाचून दचकलात ना! पण हे खरे आहे. राज्याचे सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे भक्कम पाठबळ आणि सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक पती संतोष (आण्णा) यांच्यामुळेच टार्गेट साध्य झाल्याचे रेखा वहिनींनी आवर्जून सांगितले.
रेखा वहिनींचे माहेर कोरेगाव, वडील शिक्षक त्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण असायचे. बालपण संस्कार आणि शिस्तीत गेले. सासरी मात्र माणसांचा राबतो असायचा. सासरे राजकारण, समाजकारण आणि शिक्षणक्षेत्राशी निगडीत त्यामुळे घरात सातत्याने लोकांची उठबस असायची. सासरी मात्र लोकांच्या गराडय़ात रमून गेले आणि हळूहळू लोकांशी नाळ जुळली.
वडगांव (ज स्वा) ता. खटावचे सरपंच संतोष शिदोजीराव घार्गे यांच्याशी लग्न झाले. सासरे शिदोजीराव घार्गे यांचा गावात आदरयुक्त राजकीय दरारा त्यामुळे घरातील वातावरण राजकीय. पती संतोष घार्गे यांना देखील समाजकारण आणि राजकारणाची आवड. वडगांवचे सरपंच, मार्केट कमेटीचे संचालक आणि सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक, यामुळे घरातील संसाराची आघाडी संभाळत समाजकारणाशी जोडले गेले. दीर सोमनाथ घार्गे जिल्हा पोलीस प्रमुख त्यामुळे घर नेहमी गजबजलेले. तर दुसरे दिर नवनाथ घार्गे इलेक्ट्रिक ठेकेदार त्यामुळे शेती, उद्योग व्यवसाय याचीही माहिती झाली.
सह्याद्री कुटुंबाशी नाळ कायम…
सासरे प्रगतशील शेतकरी ऊस उत्पादनामुळे सह्याद्री साखर कारखान्याशी जोडले गेले. स्व. पी. डी. पाटील साहेब यांच्यावर कायम निष्ठा ठेवली. त्यामुळे पर्यायाने पाटील म्हणजे सह्याद्री कुटुंबाबरोबर नाळ जुळली. पती संतोष घार्गे यांनी देखील या घराण्याशी प्रामाणिक आणि निष्ठावंत राहण्याचा कसोशीने प्रयत्न केला. पालकमंत्र्यांचा विश्वास संपादन केल्याने त्यांना सह्याद्री कारखान्याचे संचालक म्हणून निष्ठेचे फळ मिळाले आहे. आजही पती पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात लोकांच्या मदतीला धावून जातात.
2017 ला म्हासुर्णे गणातून राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. पती संतोष घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली. लोकांनी विश्वास ठेवून चांगल्या मतांनी निवडून दिले. 2019 ला खटावच्या सभापतीपदी निवड झाली. लोकांच्या कामाला प्राधान्य द्या. सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवा हा घरातला सल्ला आजही बरोबर घेऊन बाहेर पडते. माणसाची अडचण समजून घेऊन त्या सोडविणे हेच ध्येय समजून वाटचाल सुरु आहे.
रस्त्याचे जाळे करणार मजबूत..
मतदारसंघातील रस्ते मजबूत आणि दर्जेदार झाले तर विकासाला चालना मिळेल यासाठी पती संतोष घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे रस्त्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे मतदारसंघातील खालील रस्त्यांना वडगाव-वांझोळी अडीच कोटी, वडगाव-गोरेगाव अडीच कोटी, वडगाव- रहाटणी 2 कोटी, भूषणगड म्हासुर्णे रस्ता अडीच कोटी निधी मंजूर झाला आहे. तसेच वडगाव कुरणवस्ती रस्ता 25 लाख, वडगाव गाव अंतर्गत काँक्रीटीकरण 25 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले.
चौफेर विकासाला प्राधान्य..
रस्त्याबरोबर मतदारसंघात साकव, सिमेंट नालाबंधारे, मागासवर्गीय समाजात रस्ते काँक्रीटीकरण, गटर, तसेच शेतकऱयांची वाढती विजेची मागणी लक्षात घेऊन नवीन ट्रान्सफार्म देखील मंजूर केले आहेत. चोराडे येथे पशुवैद्यकीय दवाखाना, आणि ग्रामीण भागात कोविड लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. यापुढे देखील पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पती संतोष घार्गे यांच्या साथीने मतदारसंघात निधी उपलब्ध करून देण्यासाठी बांधील राहणार आहे.