सकाळच्या सत्रात काहीवेळ दुसरे गेट बंद : नवीन ट्रकबरोबरच पेव्हर्स बसविण्याचे काम पूर्ण
प्रतिनिधी /बेळगाव
दुसरे रेल्वेगेट येथे काम सुरू असल्यामुळे शुक्रवारी सकाळी तिसऱया रेल्वेगेटपासून फौंड्री क्लस्टर सर्कलपर्यंत वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीत अनेक वाहने अडकून पडल्यामुळे कामावर पोहोचण्यास विलंब झाला. एकीकडे अर्धवट स्थितीत असलेल्या तिसऱया रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम तर दुसरीकडे दुसरे रेल्वेगेट येथे सुरू असणाऱया कामामुळे वाहनचालक त्रस्त झाले होते.
नैर्त्रुत्य रेल्वेकडून दुसरे रेल्वेगेट येथे गुरुवारी व शुक्रवारी रेल्वेगेट बंद ठेवून ट्रक घालण्याचे काम करण्यात आले. गुरुवारी उशिरापर्यंत काम पूर्ण न झाल्यामुळे शुक्रवारी सकाळच्या सत्रातही काहीवेळ गेट बंद ठेवण्यात आले होते. नवीन ट्रकबरोबरच इतर कामेदेखील करण्यात आली. ट्रक घालण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पेव्हर्स बसवून काम पूर्ण करण्यात आले. शुक्रवारी सकाळीदेखील रेल्वेगेट बंद असल्याने तिसरे रेल्वेगेट येथून प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. आधीच तिसरे रेल्वेगेटपासून एकेरी वाहतूक सुरू होती. त्यातच काही बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडली. सकाळच्यावेळी उद्यमबाग, अनगोळ, मजगाव येथील औद्योगिक वसाहतींमध्ये कामावर जाणाऱयांची संख्या सर्वाधिक असते. या सर्वांना कामावर जाण्यास विलंब झाल्याने वाहनचालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.