प्रतिनिधी / कारवार
रेल्वेने धडक दिल्याने बिबटय़ा जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी कारवार तालुक्यातील चंडिया ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील भजनकेरी येथे घडली. मंगळूरहून कारवारकडे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱया रेल्वेची तीन वर्षाच्या (नर) बिबटय़ाला धडक बसल्याने तो जागीच ठार झाल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वन संरक्षण अधिकारी वसंतरेड्डी के. ए., साहाय्यक वनसंरक्षण अधिकारी शरणकुमार, रेंज फॉरेस्ट ऑफिसर जी. एस. नाईक, पशुवैद्यकीय अधिकारी, कोकण रेल्वेचे सेक्शन अभियंता यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. कोकण रेल्वेच्या मार्गावर बिबटय़ा, हरिण, जंगली डुक्कर आदी प्राण्यांचा वरचेवर मृत्यू होत असतो. त्याकरिता या मार्गावरील जंगली प्राण्यांची वर्दळ कशी टाळता येईल या संदर्भात अहवाल तयार करून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडे तो प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.