पहिले रेल्वेगेट आज रात्रीपर्यंत बंद : दुसरे, तिसरे रेल्वेगेटमार्गे वाहतूक वळविली
प्रतिनिधी / बेळगाव
मिरज ते लोंढा या दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण केले जात आहे. टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेट येथे दुपदरीकरणाचे प्राथमिक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारपासून दुसऱया टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात आली. रविवारी रात्रीपर्यंत रेल्वेगेट बंद राहणार असल्याने संपूर्ण वाहतूक दुसरे व तिसरे रेल्वेगेटमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे दुसरे रेल्वेगेट येथे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.
दुपदरीकरणाच्या प्राथमिक टप्प्यात नवीन ट्रक घालण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर शनिवारपासून दुसऱया टप्प्यातील काम सुरू झाले. नवीन ट्रकला कनेक्शन देणे तसेच इतर उर्वरित कामांना सुरुवात करण्यात आली. रविवारी रात्रीपर्यंत काम पूर्ण होईल, असा अंदाज रेल्वे विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
पहिले रेल्वेगेट बंद असल्यामुळे वाहतूक दुसरे व तिसरे रेल्वेगेटमार्गे वळविण्यात आली. दुसरे रेल्वेगेट येथे शनिवारी सकाळी गर्दी झाली होती. उद्यमबाग येथील कामगारांना कामावर जाण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे विलंब झाला. तिसरे रेल्वेगेटमार्गे एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे दुसरे रेल्वेगेट येथे वाहनांची संख्या वाढली होती. खानापूर रोडवरून टिळकवाडी, शहापूर, वडगाव या भागात येणाऱया नागरिकांना दुसऱया रेल्वेगेटमार्गे शहरात पोहोचावे लागले.
गांधीनगर रेल्वेगेट आज बंद
गांधीनगर येथील रेल्वेगेट क्र. 392 रविवारी दिवसभर बंद ठेवले जाणार आहे. दुपदरीकरणाचे काम केले जाणार असल्याने सकाळी 8 ते सायंकाळी 6 यावेळेत रेल्वेगेट बंद राहणार आहे. पर्यायी मार्गाचा नागरिकांनी वापर करावा, असे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.