रेल्वे स्थानकाचे 70 टक्के काम पूर्ण : जुलैपर्यंत नवीन रेल्वेस्थानक प्रवाशांसाठी खुले
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावच्या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जात असून, एक अत्याधुनिक रेल्वेस्थानक म्हणून त्याची निर्मिती केली जात आहे. प्लॅटफॉर्म क्र. 1 वरील जुन्या इमारतीचा भाग पाडण्यात आला आहे. त्या ठिकाणी अत्याधुनिक सर्व सोयींनी युक्त अशी इमारत बांधण्यात येत आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत हे नवीन रेल्वेस्थानक प्रवाशांसाठी खुले होणार आहे.
रेल विकास निगमच्या माध्यमातून 171 कोटी खर्च करून हे अत्याधुनिक हायटेक रेल्वेस्थानक बांधले जात आहे. जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी 5264 चौ. मी. चे भव्य असे प्रवेशद्वार उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. विमानतळाप्रमाणे ही नवी इमारत असणार आहे. बेळगावचे माजी खासदार व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती.
प्लॅटफॉर्म क्र.1 ची इमारत पाडली
प्रवेशद्वाराच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आल्याने आता
प्लॅटफॉर्मवरील इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची जुनी इमारत पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ही ब्रिटिशकालीन इमारत पाडून त्या ठिकाणी अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे.
यामुळे रेल्वे स्टेशनच्या आतील भागाचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे.
रेल्वे स्थानकाचे 70 टक्के काम पूर्ण
बेळगाव रेल्वे स्थानकाला दक्षिण प्रवेशद्वार उभारले जाणार आहे. यामुळे शहापूर, वडगाव, टिळकवाडी या परिसरातील प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे. 260 चौ. मी. विस्ताराचे दुसरे प्रवेशद्वार उभारले जाणार आहे. याच सोबत कोचिंग डेपोचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कोचिंग डेपो 280 मीटर लांबीचा उभारल्यानंतर बेळगावमध्येच रेल्वे डब्यांची दुरुस्ती करणे शक्मय होणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत रेल्वे स्थानकाचे 40 टक्के काम पूर्ण करण्यात आले होते. तर एप्रिल 2021 पर्यंत 70 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.