कोरोना विषाणूच्या प्रकोपानंतर रोगप्रतिकारक शक्तीला खूप महत्त्व आलं आहे. प्रतिकारक शक्ती बळकट करण्यावर भर दिला जात आहे. टीव्हीवरही इम्युनिटी बूस्टिंग काढे, टॉनिक्स, आणि औषधांच्या जाहिराती पहायला मिळत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याची काही लक्षणं आहेत. आपलं शरीर याबाबत संकेत देत असतं. हे संकेत ओळखून प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
* तुम्हाला सतत सर्दी होत असेल, खोकला, तापाने बेजार होत असाल तर तुमची प्रतिकारक्षमता कमी असू शकते. सतत आजारी पडत असाल तर आहारात प्रतिकारक्षमता वाढवणार्या पदार्थांचा समावेश करा.
* एखाद्या वस्तूची किंवा पदार्थाची ऍलर्जी असू शकते. मात्र तुम्हाला सारखी ऍलर्जी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वारंवार होणारी ऍलर्जी रोगप्रतिकारक्षमता कमकुवत असल्याचं लक्षण असू शकतं. या ऍलर्जीकडे डोळेझाक करणं महागात पडू शकतं.
* सतत येणारा थकवा हे सुद्धा कमकुवत रोगप्रतिकारशक्तीचं लक्षण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडीफार हालचाल केली तरी काहींना थकवा येतो. कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही. रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने असं होऊ शकतं.
* शरीरावरील जखमा भरायला नेहमीपेक्षा अधिक वेळ लागत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. शारीरिक दोषांमुळे असं होऊ शकतं.
पोटाशी संबंधित समस्या वारंवार उद्भवत असतील तर रोगप्रतिकारक्षमता कमी असू शकते. गॅस, आम्लपित्त, पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोटफुगी अशा तक्रारी असतील तर तपासणी करून घ्या आणि प्रतिकारक्षमता वाढवणारे पदार्थ खा.