प्रतिनिधी / वास्को
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोव्यात होणाऱया इंडियन सुपर लिग अंतर्गंत फुटबॉल सामन्यांना आक्षेप घेतला आहे. या आयोजकांनी कमाईच्या सर्व संधी गोव्याबाहेरील लोकांना दिलेल्या असून त्या संधी स्थानिक लोकांनाच देण्यात याव्यात अन्यथा सामने होऊ देणार नसल्याचा ईशारा काँग्रेसने दिला आहे. बुधवारी संध्याकाळी नागोवा वेर्णा येथील मैदानाजवळ या कार्यकर्त्यांनी आयोजकांना जाब विचारला व खेळाडूंना घेऊन आलेली एक गोव्याबाहेरील बस परत पाठवली.
या प्रश्नावरून नागोवा पंचायतीजवळील मैदानासमोर बराच वेळ हंगामा झाला. पोलीसही घटनास्थळी हजर झाले. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर व त्यांचे पदाधिकारी अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी, ऍड. वरद म्हार्दोळकर, सचिन परब, विरेंद्र शिरोडकर, गौतम भंडारी, पुष्कल सावंत, माजी जिल्हा पंचायत सदस्य मारीयान रॉड्रिग्स, अर्चित नाईक व गोव्यातील विविध भागातील इतर कार्यकर्ते या ठिकाणी मोठय़ा संख्येने एकत्र आले होते. यावेळी त्यांनी गोव्याच्या हिताच्या समर्थनात घोषणाही दिल्या. सरकारवरही जोरदार टीका केली. उद्या शुक्रवारपासून फातोर्डा, बांबोळी व वास्कोतील मैदानांवर इंडियन सुपर लिगचे सामने सुरू होणार आहेत. काल संध्याकाळी नागोवा येथील मैदानावर सरावासाठी फुटबॉलपटूंना घेऊन एक अलिशान बस आली होती. मात्र, जमलेल्या कार्यकर्त्यांनी ती बस तब्बल दोन तास रोखून धरली. बसमधील खेळाडूंना खाली उतरू दिले नाही. आयोजकांशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली. जोपर्यंत या फुटबॉल सामन्यांमुळे निर्माण झालेला रोजगार स्थानिक लोकांना मिळत नाही तोपर्यंत गोव्यात कुठेच सामने होऊ दिले जाणार नाही असे काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी बजावले. त्यामुळे त्या बसला खेळाडूंना घेऊन परत जाणे भाग पडले.
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की फुटबॉल सामन्यांना आमचा विरोध नाही. मात्र, गोमंतकीयांवर झालेल्या अन्यायाविरूध्द आम्ही आवाज उठवलेला आहे. हा अन्याय दूर करावा व खुशाल सामने आयोजीत करावेत. दरवर्षी अशा सामन्यांच्या वेळी स्थानिक व्यवसायीकांना आर्थिक लाभ होत असतो. स्थानिक बसगाडय़ा, टॅक्सी, वीज व ध्वनीयंत्रणा, मैदान सवर्धनाची कामे, सुरक्षा व्यवस्था व इतर कामे स्थानिकांना मिळत होती. मात्र, यंदा आयोजकांनी ज्या कंपनीला ही जबाबदारी दिलेली आहे, त्यांनी या सर्व सेवा गोव्याबाहेरून उपलब्ध केलेल्या असून काँग्रेसने याची गंभीर दखल घेतली आहे. महामारीमुळे गोवेकर त्रस्त झालेला आहे. त्याचा रोजगार गेलेला असताना हा रोजगारही हिरावला गेलेला असल्याची माहिती संकल्प आमोणकर यांनी दिली. यापूर्वी सुचना करूनही आयोजकांनी ही चूक केलेली आहे. गोवा फुटबॉलसाठी देशभरात ओळखला जातो आणि त्यानिमित्त उपलब्ध होणाऱया संधी गोव्याबाहेर पुरवल्या जात असल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, वेर्णा नागोवा येथे हा हंगामा चालू असतानाच काँग्रेसचे नेते आमदार दिगंबर कामत व गिरीष चोडणकर यांचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पाहोचला. या संदेशानुसार आज गुरूवारी संध्याकाळी या विषयावर पणजीत आयोजकांसोबत चर्चा होणार आहे. तशी तयारी आयोजकांनी दाखवलेली आहे. त्यामुळे ज्या उध्दीष्ठांसाठी आम्ही संघर्ष करीत आहोत ते उध्दीष्ठ सफल होईल अशी अशा निर्माण झाल्याचे संकल्प आमोणकर म्हणाले. आयोजकांनी कार्यकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेतल्यानंतर उपस्थित कार्यकर्ते माघारी परतले.