प्रतिनिधी /पणजी
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3170 चे गव्हर्नर म्हणून गौरीश धोंड यांची नेमणूक करण्यात आली असून ते आज 1 जुलैपासून त्या पदाचा ताबा घेणार आहेत.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 मध्ये गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र मिळून 139 रोटरी क्लबचा समावेश आहे. त्यात एकूण 6300 सदस्य असून विविध समाजपयोगी योजना क्लबतर्फे जनतेसाठी राबविल्या जातात. धोंड हे पणजी रोटरी क्लबचे सदस्य असून गेली सुमारे 20 वर्षे ते क्लबच्या माध्यमातून जनतेसाठी सेवा देत आहेत. त्यांनी क्लबची डिस्ट्रिक्ट 3170ची विविध पदे भूषविली असून ते सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहेत.
त्यांचा कार्यकाळ 1 वर्षासाठी असून सर्व रोटरी क्लबनी जनतेच्या सेवेसाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केले. मुलींचे शिक्षण, महिलांचे सशक्तीकरण, रक्तदान शिबिरे, रुग्णवाहिका, सार्वजनिक आरोग्यासाठी उपकरणे, फळझाडे लागवड, सौरउर्जा, पाणी संवर्धन व इतर क्षेत्रात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रोटरीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.