आयपीएल स्पर्धा : कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी एकतर्फी विजय, रोहितसह यादव, तिवारीचीही फटकेबाजी, बोल्ट-बुमराहचे प्रत्येकी 2 बळी
वृत्तसंस्था / अबु धाबी
सामनावीर रोहित शर्मा (54 चेंडूत 80), सुर्यकुमार यादव (28 चेंडूत 47) यांची फटकेबाजी व ट्रेंट बोल्ट, बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने प्रतिस्पर्धी केकेआरचा आयपीएल साखळी सामन्यात 49 धावांनी सहज फडशा पाडला. मुंबईने प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर 20 षटकात 5 बाद 195 धावांची आतषबाजी केली तर प्रत्युत्तरात केकेआरला 20 षटकात 9 बाद 146 धावांवर समाधान मानावे लागले.
केकेआरतर्फे कर्णधार दिनेश कार्तिक (30), नितीश राणा (24), मॉर्गन (16), आंद्रे रसेल (11) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. 8 व्या स्थानी आलेल्या पॅट कमिन्सने 12 चेंडूत 33 धावांची आतषबाजी केली. त्याच्या फटकेबाजीमुळे बुमराहच्या डावातील 18 व्या षटकात केकेआरने 4 षटकारांसह 27 धावा वसूल केल्या. पण, तोवर हा सामना केकेआरच्या हातातून निसटला होता.
विजयासाठी 196 धावांचे कठीण आव्हान असताना केकेआरला खाते उघडण्यासाठी चक्क 9 व्या चेंडूपर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. शुभमन गिलने ही कोंडी फोडण्यासाठी आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला मिडविकेटवरील पोलार्डकडे झेल देत परतणे भाग पडले. सुनील नरेनचा खराब फॉर्म येथेही कायम राहिला.
संघाची गरज ओळखत कर्णधार दिनेश कार्तिक बढतीवर फलंदाजीला आला. पण, 23 चेंडूत 5 चौकारांसह 30 धावांवर तो बाद झाला, त्यावेळी केकेआरच्या अडचणीत आणखी भर पडली. नितीश राणाने 18 चेंडूत 24 धावा जमवल्या. मात्र, तो ही पोलार्डच्या गोलंदाजीवर पंडय़ाकडे झेल देत तंबूत परतला.
आघाडीचे 4 फलंदाज 77 धावात गारद झाल्यानंतर मॉर्गन-रसेलकडून केकेआरला अपेक्षा होत्या. या जोडीने फटकेबाजीवर भरही दिला. पण, बुमराहने रसेलचा (11) त्रिफळा उडवला तर मॉर्गनलाही (16) यष्टीमागे झेलबाद करत आणखी एक धक्का दिला. षटकामागे आवश्यक धावगती वाढतच जात असताना केकेआरच्या प्रयत्नांवर बऱयाच मर्यादा असणे साहजिकच होते.
रोहित, यादवची फटकेबाजी
कर्णधार रोहित शर्माने 54 चेंडूत 80 धावांची जोरदार आतषबाजी केल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने निर्धारित 20 षटकात 5 बाद 195 अशी तगडी धावसंख्या उभी केली. सुर्यकुमार यादवनेही रोहितला उत्तम साथ देताना 28 चेंडूत 47 धावांचे योगदान दिले. शेवटच्या 4 षटकात मुंबईने येथे 2 गडय़ांच्या बदल्यात 47 धावांची आतषबाजी केली.
रोहित शर्माची फटकेबाजी हे मुंबईच्या डावाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. जागतिक स्तरावरील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक असलेल्या या मुंबईकर फलंदाजाने प्रारंभापासूनच केकेआरच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण चढवण्याचा सपाटा लावला होता. येथील छोटय़ा मैदानावर सहजसुंदर फटकेबाजी करत त्याने टोलेजंग फटके लगावले. त्याच्या 54 चेंडूतील 80 धावांच्या खेळीत 3 चौकार व 6 षटकारांचा समावेश राहिला. युवा गोलंदाज शिवम मावीच्या गोलंदाजीवर कमिन्सकडे झेल देत रोहित बाद झाला, त्यावेळी मुंबईने एव्हाना 17.5 षटकात 177 धावांपर्यंत मजल मारली होती.
प्रारंभी खराब सुरुवात
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर सलामीवीर क्विन्टॉन डी कॉक (1) डावातील दुसऱयाच षटकात बाद झाल्यानंतर मुंबईची खराब सुरुवात झाली. पण, रोहित शर्माने धुवांधार फलंदाजी केली. 28 चेंडूत 47 धावांचे योगदान देणाऱया सुर्यकुमार यादवने देखील त्याला उत्तम, समयोचित साथ दिली. या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 9.3 षटकात 90 धावांची दणकेबाज भागीदारी साकारली. सुर्यकुमार धावचीत होऊन तंबूत परतला. नंतर सौरभ तिवारीने अवघ्या 13 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 21 धावांची आतषबाजी केली.
सुर्यकुमार यादव डावातील 11 व्या षटकात धावचीत झाल्याने ही जोडी फुटली. डीप मिडविकेटवरील नरेनने अचूक थ्रो केल्यानंतर मॉर्गनने आपली जबाबदारी चोख पार पाडली. सुर्यकुमार यादव यावेळी क्रीझबाहेर होता. सौरभ तिवारीने अवघ्या 13 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 21 धावांची आतषबाजी केली. पण, याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करण्यापूर्वी तो बाद झाला. नरेनने त्याला कॅरम बॉलवर लाँगऑफवरील कमिन्सकरवी झेलबाद केले.
कमिन्सची महागडी गोलंदाजी
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी विशेष महत्त्वाकांक्षी असलेल्या पॅट कमिन्सला या लढतीत मुंबईच्या फटकेबाजीची चांगलीच किंमत मोजावी लागली. कमिन्सने 3 षटकात 49 धावा मोजल्या आणि यानंतर त्याला शेवटचे चौथे षटकही सोपवले गेले नाही.
जेव्हा हार्दिक पंडय़ा हिट विकेट झाला!
डावातील 19 व्या षटकात हार्दिक पंडय़ाचे स्वयंचीत होणे आश्चर्याचे ठरले. रसेलच्या षटकात तिसऱया चेंडूवर यॉर्कर टाकल्यास तो परतावून लावण्यासाठी पंडय़ाने यष्टीच्या बऱयाच जवळ स्टान्स घेतला होता. रसेलने अपेक्षेप्रमाणे यॉर्करही टाकला. पण, तो परतावून लावण्यापूर्वीच पंडय़ाच्या बॅटने बेल्स उद्ध्वस्त केल्या आणि त्याला तंबूत परतावे लागले. यंदाच्या आयपीएल हंगामात स्वयंचीत बाद होणारा पंडय़ा हा पहिला फलंदाज ठरला आहे.