वृत्तसंस्था/ लंडन
लँकेशायर कौंटी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष डेव्हिड हॉजकिस यांचा मृत्यू झाला. कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते निर्वतले. निधनसमयी ते 71 वर्षांचे होते.
लँकेशायरने
अधिकृत जारी केलेल्या पत्रात त्यांच्या मृत्यूचे थेट कारण स्पष्ट केले नाही. मात्र,
या क्लबच्या प्रवक्त्याने त्यांचा मृत्यू कोरोना संलग्न असल्याचे सांगितले. हॉजकिस
यांना तब्येतीच्या अन्य बऱयाच तक्रारीही
होत्या.
इमिरेट ओल्ड ट्रफोर्ड कार्यकारिणीवर हॉजकिस 22 वर्षे कार्यरत होते. कार्यकारिणी सदस्य, खजिनदार, उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर ते अध्यक्षपदी रुजू झाले. 2017 मध्ये मायकल केर्न्स यांच्यानंतर ते अध्यक्षपदी विराजमान झाले होते.
‘लँकेशायर क्रिकेट क्लबमधील प्रत्येकाकडून त्यांनी आदर व प्रेम मिळवले. अवघ्या क्रिकेट जगतात त्यांच्याबद्दल सर्वांना आस्था असायची. त्यांनी विविध पदावर क्लबसाठी दिलेले योगदान निश्चितच महत्त्वाचे आहे. त्यांची उणीव क्लबला सातत्याने जाणवत राहील’, असे लँकेशायर क्लबने येथे नमूद केले.
इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कॉलिन ग्रेव्हस यांनीही डेव्हिड यांना श्रद्धांजली वाहिली. ‘डेव्हिड हे लँकेशायर क्लबचे महत्त्वपूर्ण घटक होते आणि हा खेळ देशातील कानाकोपऱयात विकसित होत जावा, यावर त्यांचे विशेष लक्ष केंद्रित असायचे’, असे ते याप्रसंगी म्हणाले.