जमीन घोटाळा प्रकरण , एसआयटीची कारवाई
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित महम्मद सुहैल शफी उर्फ मायकल याला गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुऊवारी रात्री उशिरा अटक केली आहे. जमीन घोटाळ प्रकरणातील अनेक तक्रारींमध्ये महम्मद शफी याचा समावेश असून गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधात होते. अखेर गुऊवारी रात्री त्याला शिताफिने अटक करण्यात आली.
संशयित महम्मद सुहैल शफी याला यापूर्वी जूनमध्ये जमीन घोटाळा प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. नंतर आणखीन एका जमीन घोटाळा प्रकरणाच्या तक्रारीत त्याचा समावेश असल्याचे आढळून येताच एसआयटीने त्याला पुन्हा अटक करण्याची तयारी केली होती. अटक चुकविण्यासाठी त्याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
फरार होता महम्मद सुहैल शफी
अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयालयाने फेटाळून लावल्यानंतर महम्मद सुहैल शफी हा फरार झाला होता. जमीन घोटाळ प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या आणि अनेक जमीन घोटाळ प्रकरणात सहभागी असलेल्या संशयित महम्मद सुहैल शफी उर्फ मायकल याला अखेर एसआयटीने अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस त्याच्या साथीदारांचाही शोध घेत आहेत. महम्मद सुहैल शफी याच्या विरोधात 2013 -14 साली जमीन घोटाळा प्रकरणी तीन गुन्हे नोंद आहेत.
आसगावातील प्रकरणात अटक
आसागाव गावातील सर्वे क्रमांक 33/1 जमीन प्रकरणात एसआयटीने जगदीप बन्सल यांच्या तक्रारीवरून सुनील कुमार व त्याची पत्नी श्रीमती बिस्मी सुनील दोघेही तिस्क उसगाव फोंडा येथे राहणारे, संजय पाटील व त्याची पत्नी उज्वला पाटील नाणुस उसगाव फोंडा येथे राहणारे परप्रांतीय, यांच्या विरोधात भादंसं 420, 465, 467, 468, 471 कलमाखाली गुन्हा नोंद केला होता. संशयितांनी सर्वे क्रमांक 33/1 ची बनावट कागदपत्रे तयार केली. ती कागदपत्रे अधिकाऱ्यांसमोर सादर करून जमिनीचा मालकी हक्क हस्तांतरित केला. त्यामुळे तक्रारदाराची फसवणूक केली. या प्रकरणात महम्मद सुहैल शफी असल्याचे आढळून येताच पोलिसांनी महम्मद सुहैल याला अटक केली आहे.