ख्रिस गेल, लसिथ मलिंगा, प्लंकेट-बोपाराची स्पर्धेतून माघार
कोलंबो / वृत्तसंस्था
टी-20 क्रिकेटचे दोन दिग्गज बादशाह ख्रिस गेल, लसिथ मलिंगा यांच्यासह इंग्लंडचे लियाम प्लंकेट, रवी बोपारा यांनी उद्घाटनाच्या लंका प्रीमियर लीग स्पर्धेतून माघार घेतली असून प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच हा मोठा धक्का मानला जात आहे. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, दि. 26 नोव्हेंबर पासून या स्पर्धेचे बिगूल वाजणार आहे.
या स्पर्धेत कोलंबो, कँडी, गॅले, डम्बुला व जाफना असेल 5 संघ सहभागी होतील. त्यापैकी कँडी प्रँचायझी बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा भाऊ सोहेल खानने खरेदी केली आहे. या संघाला लंकेचा माजी फलंदाज हसन तिलकरत्ने प्रशिक्षण देणार आहे.
गेल व प्लंकेट यांच्या माघारीच्या वृत्ताला कँडी टस्कर्स या त्यांच्या प्रँचायझींकडून दुजोरा मिळाला. मलिंगाने तयारीला पुरेसा वेळ मिळत नसल्याने माघार घेतली असल्याचे इएसपीएन क्रिकइन्फोने आपल्या वृत्तात म्हटले आहे. टस्कर्सने ख्रिस गेल खेळणार नसल्याचे ट्वीट केले. पण, याचे कारण त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
41 वर्षीय ख्रिस गेलच्या खात्यावर टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम नोंद असून अलीकडेच आयपीएलमध्ये त्याने किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. श्रीलंकेचा टी-20 कर्णधार लसिथ मलिंगा लंका लीगमध्ये गॅले ग्लॅडिएटर्सचे नेतृत्व करणे अपेक्षित होते. पण, मार्चपासून किंचीतही सराव नसल्याने आपण खेळू शकत नसल्याचे त्याने आपल्या प्रँचायझीला कळवले.
‘मागील महिन्यात सर्वसाधारण मसुदा तयार झाला, त्यावेळी प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वी तीन आठवडे सरावासाठी देण्यात येतील, असा माझा विचार होता. पण, तसे काहीही झाले नाही. उलटपक्षी, आम्हालाच त्यांनी 3 दिवस क्वारन्टाईन होण्याची सूचना केली. सरावाशिवाय, कोणत्याही स्पर्धेत खेळणे गोलंदाजांना कधीच शक्य नसते. लंकन लीगमध्ये सलग दिवशीही सामने आहेत. त्यामुळे, मी त्या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला’, असे मलिंगा आपल्या निर्णयाबद्दल बोलताना म्हणाला. पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमदने देखील गॅले ग्लॅडिएटर्स संघातून माघार घेतली आहे. खेळाडूंचे करार व त्यांचे मानधन अदा करण्याबाबतही प्रँचायझींकडून बऱयाच तक्रारी आहेत, असे त्याने येथे नमूद केले.
भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण, मुनाफ पटेल, स्थानिक आयकॉन कुशल परेरा, लंकन टी-20 स्पेशालिस्ट कुसल मेंडिस, नुवान प्रदीप आदी खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. इंग्लिश फलंदाज रवी बोपाराचा जाफना स्टॅलियन्स संघात समावेश होता. पण, त्याने देखील नकारघंटा वाजवली आहे.