कसोटी मालिकेच्या तयारीला प्रारंभ, इशांतसह ऑस्ट्रेलियाला एकत्रित रवाना होणार
बेंगळूर / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलिया दौऱयाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय सलामीवीर रोहित शर्माने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस ट्रेनिंगला प्रारंभ केला आहे. रोहित शर्माचा ऑस्ट्रेलिया दौऱयातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघात समावेश नाही. मात्र, सुधारित कसोटी संघात त्याची वर्णी लागली आहे. रोहितने आयपीएलमधील उर्वरित दोन सामने जिंकत मुंबई संघाला फायनल जिंकून दिल्यानंतर हा बदल झाला.
आयपीएल स्पर्धेदरम्यान रोहितने आपण पूर्ण तंदुरुस्त असल्याचा निर्वाळा जरुर दिला होता. पण, तरीही त्याला धोंडशिरेच्या दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असल्याचा नियामक मंडळाचा कयास आहे. आयपीएलदरम्यानच त्याला ही दुखापत झाली. पण, त्याला संघातून वगळल्याची घोषणा झाली आणि येथेच खरे नाटय़ सुरु झाले.
संघनिवडीची घोषणा झाल्यानंतर व त्यात रोहितला स्थान नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही अवधीतच मुंबई इंडियन्सने रोहित सराव करत असल्याचा एक व्हीडिओ पोस्ट केला आणि अर्थातच तो वाऱयाच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत राहिला. स्वतः रोहित नंतर फायनलमध्ये आपला झंझावात आणखी एकदा प्रत्यक्षात साकारण्यात यशस्वी ठरला. त्याने 68 धावांची दमदार खेळी साकारली आणि मुंबईने तो सामना एकतर्फी फरकाने जिंकला.
आयपीएल स्पर्धा सरली व त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱयावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले. त्यातच कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार असल्याने रोहित शर्माची तंदुरुस्ती आणखी महत्त्वाची ठरणार, हे निश्चित झाले.
बुधवारी अनुभवी जलद गोलंदाज इशांत शर्माने देखील विद्यमान निवड समिती अध्यक्ष सुनील जोशी व राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमुख राहुल द्रविड यांच्या देखरेखीखाली कसून सराव केला. इशांत व रोहित हे दोघेही एकाच वेळी ऑस्ट्रेलियाला रवाना होतील आणि 14 दिवसांचे क्वारन्टाईन पूर्ण केल्यानंतर संघात दाखल होणार आहेत.