गॅलेतील पहिली कसोटी, दुसरा दिवस- लंका पहिला डाव सर्वबाद 386
वृत्तसंस्था / गॅले
येथे सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत रविवारी खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर यजमान लंकेची स्थिती अधिक मजबूत झाली असून विंडीजची पहिल्या डावात घसरगुंडी झाली. लंकेचा पहिला डाव 386 धावांवर आटोपल्यानंतर विंडीजने पहिल्या डावात दिवसअखेर 6 बाद 113 धावा जमविल्या. लंकेच्या डावात विंडीजच्या रोस्टन चेसने 83 धावांत 5 गडी बाद केले.
या कसोटीत लंकेने 3 बाद 267 या धावसंख्येवरून दुसऱया दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे 7 फलंदाज 119 धावांची भर घालत तंबूत परतले. या सामन्यातील खेळाचा दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजविला. दिवसभरात एकूण 12 गडी बाद झाले. लंकेच्या पहिल्या डावात कर्णधार करुणारत्नेने 300 चेंडूत 15 चौकारांसह 147, धनंजय डिसिल्वाने 95 चेंडूत 5 चौकारांसह 61, निशांकाने 7 चौकारांसह 56, चंडीमलने 5 चौकारांसह 45 धावा जमविल्या. धनंजय डिसिल्वा आणि करुणारत्ने यांनी चौथ्या गडय़ासाठी 111 धावांची भागिदारी केली. 133.5 षटकात लंकेचा पहिला डाव 386 धावांत आटोपला. विंडीजतर्फे रोस्टन चेसने 83 धावात 5 तर वेरीकेनने 87 धावात 3 तसेच गॅब्रियलने 69 धावात 2 बळी मिळविले.
विंडीजची पडझड
लंकेच्या अचूक गोलंदाजीसमोर विंडीजचा पहिला डाव कोलमडला. दिवसअखेर विंडीजला पहिल्या डावात 42 षटकात 6 बाद 113 धावांवर समाधान मानावे लागले. कर्णधार ब्रेथ वेटने 7 चौकारांसह 41, ब्लॅकवूडने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 20, शाय हॉपने 10 धावा केल्या. मेयर्स 5 चौकारांसह 22 धावांवर खेळत आहे. लंकेतर्फे रमेश मेंडिसने 23 धावात 3, जयविक्रमाने 25 धावात 2 तसेच इंबुल्डेनियाने 39 धावात 1 गडी बाद केला. विंडीजचा संघ 273 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 4 गडी बाकी आहेत.
या कसोटीत लंकेने आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. या सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवशी जखमी झालेला विंडीजचा खेळाडू जेरेमी सोलोझेनो हा रुग्णालयातून हॉटेलमध्ये परतला. लंकेच्या पहिल्या डावात करुणारत्नेचा मारलेला फटका सोलोझेनोच्या हेलमेटवर आदळल्याने तो जखमी झाला होता. वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्यावर उपचार करून त्याला संघात दाखल होण्यासाठी परवानगी दिली.
संक्षिप्त धावफलक
लंका प. डाव – 133.5 षटकात सर्वबाद 386 (करुणारत्ने 147, धनंजय डिसिल्वा 61, निशांका 56, चंडिमल 45, रमेश मेंडीस 13, चेस 83-5, वेरीकेन 3-87, गॅब्रियल 2-69), विंडीज प. डाव – 42 षटकात 6 बाद 113 (ब्रेथ वेट 41, ब्लॅकवूड 20, मेयर्स खेळत आहे 22, होल्डर खेळत आहे 1, रमेश मिंडीस 3-23, जयविक्रमा 2-26, इंबुलडेनिया 1-39).