वृत्तसंस्था/ कोलंबो
यजमान लंकेने बांगलादेशविरूद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशी जिंकली. कँडीमध्ये सोमवारी झालेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत खेळाच्या शेवटच्या दिवशी लंकेने बांगलादेशचा 209 धावांनी दणदणीत पराभव केला. लंकेच्या प्रवीण जयविक्रमाला ‘सामनावीर’ तर लंकेचा कर्णधार करूणारत्नेला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या दुसऱया कसोटीत लंकेने आपला पहिला डाव 7 बाद 493 धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव 251 धावांत आटोपल्याने लंकेने 242 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर लंकेने आपला दुसरा डाव 9 बाद 194 धावांवर घोषित करून बांगलादेशला विजयासाठी 437 धावांचे कठीण आव्हान दिले. या कसोटीतील सोमवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी लंकेला बांगलादेशचे शेवटचे पाच गडी बाद करण्यासाठी सुमारे तासाचा कालावधी लागला. बांगलादेशचा दुसरा डाव 227 धावांत आटोपल्याने लंकेने हा सामना 209 धावांनी जिंकला. कसोटी पदार्पणात 11 बळी घेणाऱया प्रवीण जयविक्रमाने ‘सामनावीर’ पुरस्कार मिळविला. बांगलादेशच्या दुसऱया डावात फिरकी गोलंदाज रमेश मेंडीसने 4 तर जयविक्रमाने 86 धावांत 5 गडी बाद केले. बांगलादेशच्या दुसऱया डावात रहीमने पाच चौकारांसह 40, मेहदी हसनने 4 चौकारांसह 39, जेसनने 1 षटकार आणि 5 चौकारांसह 34, कर्णधार मोमिनूल हकने 4 चौकारांसह 32, नजमूल हुसेनने 4 चौकारांसह 26, तमीम इक्बालने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24, दासने 1 चौकारांसह 17 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक
लंका प.डाव 7 बाद 493 डाव घोषित, बांगलादेश प.डाव सर्वबाद 251, लंका दु. डाव 9 बाद 194 डाव घोषित, बांगलादेश दु.डाव 71 षटकांत सर्वबाद 227 (रहीम 40, मेहदी हसन 39, जेसन 34, नजमूल हुसेन 26, मोमिनूल हक 32, तमीम इक्बाल 24, दास 17, प्रवीण जयविक्रमा 5-86, रमेश मेंडीस 4-103, धनंजय डिसिल्वा 1-19).