वृत्तसंस्था/ सारब्रुकेन
जर्मनीत मंगळवारपासून सुरू होणाऱया सेरलोरलक्स खुल्या सुपर 100 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा विद्यमान विजेता लक्ष्य सेन पुन्हा सलग जेतेपद मिळविण्यावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन, अजय जयराम आणि शुभंकर भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
नुकत्याच झालेल्या डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत 19 वर्षीय लक्ष्य सेनला पुरूष एकेरीच्या दुसऱयाच फेरीत अनुभवी हेन्स व्हिटींगसकडून पराभव पत्करावा लागला होता. जर्मनीतील या स्पर्धेसाठी लक्ष्य सेनने गेल्या आठवडाभरात पीटर गेड अकादमीमध्ये कसून सराव केला आहे. गेल्यावर्षीच्या बॅडमिंटन हंगामात लक्ष्य सेनने वरिष्ठांच्या सर्कीटमध्ये पाच अजिंक्यपदे मिळविली आहेत. मंगळवारपासून खेळविल्या जाणाऱया या स्पर्धेत लक्ष्य सेनला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. या स्पर्धेत त्याचा दुसऱया फेरीतील सामना अमेरिकेचा शु आणि इटलीचा कॅपोनिओ यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर होईल. जर्मनीतील या स्पर्धेत एकेरीत अजय जयराम, नवोदित मालविका बनसुद आणि शुभंकर सहभागी होत आहेत.