लखनौ
येत्या आयपीएल मोसमात नव्याने सामील झालेल्या लखनौ सुपर जायंट्स प्रँचायझीने सोमवारी आपल्या संघाच्या लोगोचे अनावरण केले. या आयपीएलसाठी लवकरच मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे.
भारतीय पुराणकथातून प्रेरणा घेत त्यांनी हा लोगो बनविला आहे. ‘गरुड हा संरक्षणाचे प्रतीक असून अतिशय वेगवान हालचाली करण्याची त्याच्यात क्षमता आहे. त्यातून प्रेरणा घेत आम्ही गरुडाच्या पंखांचा आम्ही लोगोमध्ये वापर केला आहे. भारतीय संस्कृतीत गरुड हे सर्वव्यापी आहे,’ असे एलएसजीने म्हटले आहे. पंखांचे तीन रंग पॅन इंडियाचे प्रतीक आहे तर शरीराचा भाग निळय़ा रंगाच्या बॅटने व्यापला आहे. ते क्रिकेटची प्रतीक आहे. याशिवाय ऑरेंज सीम असलेला लाल चेंडूही त्यात आहे. हा चेंडू म्हणजे पवित्र जयतिलक असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.
उंच उंच भरारी घेत यशाची शिखरे पादाक्रांत करणे, हा संदेश या लोगोतून देण्यात आला आहे. येत्या आयपीएलमध्ये केएल राहुलला त्यांनी कर्णधारपदी नियुक्त केले असून रवी बिश्नोई व मार्कस स्टोइनिसलाही त्यांनी करारबद्ध केले आहे. अँडी फ्लॉवर यांची त्यांनी याआधीच प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे तर माजी सलामीवीर गौतम गंभीर या संघाचा मेंटर आहे.