ऑनलाईन टीम / लेह :
भारतीय सशस्त्र दलाच्या सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) लडाखमध्ये जगातील सर्वाधिक उंचीवरचा मोटरेबल रोड बांधला आहे. देशाच्या उत्तर सीमेवर अति दुर्गम भागात लडाखच्या उमलिंगला येथे 19024 फुट उंचीवर हा रस्ता असून, त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, मंगळवारी गिनीज बुकने सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक (डीजीबीआर) लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांना रस्त्याच्या बांधकाम आणि ब्लॅकटॉपिंगसाठी प्रमाणपत्र दिले.
दरम्यान 52 किमी लांबीच्या या रस्त्यामुळे पूर्व लडाख चुमार सेक्टरमधील महत्वाची शहरे जोडली जाणार आहेत. लेह ते चीसूमले, डेमचोक साठी हा सरळ, पक्का रस्ता झाला आहे. हा रस्ता खडतर खारदुंगला पेक्षाही चालकांसाठी मोठे आव्हान आहे. हिवाळय़ात या भागाचे तापमान उणे 40 अंशांपर्यंत घसरते आणि येथे प्राणवायूचे प्रमाण कमी असल्याने अधिक काळ थांबणे शक्य होत नाही. या रस्त्याने बोलिव्हिया येथील 18953 फुट उंचीवरच्या रस्त्याचे रेकॉर्ड मोडले आहे. बोलिव्हियामधील रस्ता उडूरुंकू नावाच्या ज्वालामुखीला जोडणारा असून तो आत्तापर्यंत जगातील सर्वाधिक उंचीवरचा मोटरेबल रोड होता.